Join us

धुक्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत, गावरान आंबा मोहरला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:00 IST

फळांचा राजा आंब्याला यावर्षी पोषक वातावरणाअभावी मोहरच लागला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोहरच फुटला नसल्याने गावरान आंब्याची चव ...

फळांचा राजा आंब्याला यावर्षी पोषक वातावरणाअभावी मोहरच लागला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोहरच फुटला नसल्याने गावरान आंब्याची चव दुर्मीळ होणार आहे. मध्यंतरी बिघडलेल्या वातावरणामुळे आंब्याच्या पिकावर मोठा परिणाम झालेला आहे. झाडांना ऐन मोहर लागण्याच्या वेळेलाच अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे याचा मोठा फटका बसला आहेे. 

यावर्षी सतत अवकाळी पाऊस व धुक्यामुळे आंब्याला अद्याप फुलोरा आला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याची सुरुवात होऊनसुद्धा आंबा मोहरला नाही. परिणामी, यावर्षी गावरान आंब्याची चव मिळणे कठीण होणार असल्याचे चित्र आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उमरा परिसरात गावरान आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या आंब्याच्या भरवशावर बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुरळीत चालते. मागील वर्षी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते. त्या आशेने यावर्षी चांगले उत्पादन होईल, अशी आस धरून शेतकरी बसला होता. परंतु, सतत अवकाळी पाऊस पडत असून, त्याचबरोबर धुके पडत असल्याने यावर्षी गावरान आंबा मोहरला नाही. त्यामुळे यावर्षी गावरान आंबा मिळणे कठीण होणार असल्याचे चित्र आहे. 

शेतकरी म्हणतात... 

गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी गावरान आंब्याला फुलोर आलाच नाही. त्यामुळे गावरान आंब्याची चव मिळणे कठीण झाले आहे. यंदा अपेक्षित उत्पादन हाती येणार की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावर्षी पाऊस अपुरा पडला व गावरान आंब्याच्या फुटीवेळी अवकाळी पाऊस व धुके पडल्याने या वर्षी गावरान आंच्याचा फुलोरा गळाला आहे. त्यामुळे गावरान आंब्याची फुट झाली नाही व शेतकऱ्याचे नुकसान झाले. यावर्षी अवकाळी पाऊस व धुक्याचा फटका आंबा पिकाला फटका बसला. डिसेंबरमध्ये सतत धुके पडल्याने बहुतांश आंब्याचा मोहर जागेवरच जळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना आब्याच्या दुसन्या फुटीची अपेक्षा आहे.

आम्रपाली, दशहरीला पसंती

गावरान आंबा जानेवारीचा पहिला आठवडा होऊनसुद्धा मोहरला नसल्याने उन्हाळ्यात गावरान आंबा मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. उमरा परिसरात बहुतांश शेतकरी आंब्याच्या आम्रपाली, दशहरी जातीला आपली पसंती देतात. आंब्याचे पीक वातावरणातील बदलांवर अवलंबून असते. वातावरणाची साथ मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीआंबाहवामान