Maharashtra Weather Update : नैऋत्य मान्सून (Monsoon), म्हणजेच भारतीय मान्सून (यंदाचा पावसाळा), वि्षुववृत्त समांतर, पूर्वेकडून पश्चिमेकडे, प्रशांत महासागरीय प्रवास करत, मलेशिया, सिंगापुर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) म्हणजे १० डिग्री उत्तर अक्षवृत्त व १०० डिग्री पूर्व रेखावृत्त दरम्यान, येत्या आठच दिवसात म्हणजे १३ मे दरम्यान मजल-दरमजल करत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात भारत महासागरीय परिक्षेत्रात मान्सून प्रवेशला तरी भारत भू -भागावर म्हणजे केरळात (Kerala Monsoon) व त्यानंतर सह्याद्री ओलांडून महाराष्ट्रात (Maharashtra Monsson) येण्यासाठी बराच कालावधी लोटला जातो. मात्र मान्सूनच्या या गती-विधिमुळे त्या अगोदर पडणाऱ्या पूर्वमोसमी गडगडाटी पावसाला चालना मिळते.
अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) वातावरण व गारपीट संबंधी, परवा रविवार दि. ४ मेला दिलेला अंदाज कायम असुन, उर्वरित महाराष्ट्राबरोबरच, मुंबईसह कोकणातही आज व उद्या (६ व ७ मे) तर मराठवाड्यातही उद्या व परवा (७ व ८ मे) ला अवकाळीच्या वातावरणाची शक्यता वाढली आहे.
दिवसाची तापमाने खालीप्रमाणे
कोकण ३३ ते ३५ डिग्री, मध्य महाराष्ट्र ३७ ते ४१, विदर्भ व मराठवाडा ३८ ते ४१ डिग्री. कोकणातील ही तापमाने सरासरी तर उर्वरित महाराष्ट्रात ही तापमाने सरासरीच्या खाली असुन भर उन्हाळ्यात उष्णतेच्या तापेपासून महाराष्ट्राला सुसह्यताच मिळत आहे, असे समजावे. महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा उष्णतेच्या लाटेची सध्या कुठेही शक्यता जाणवत नाही.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune