Join us

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील दहा दिवस थंडी कशी असेल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 19:52 IST

Maharashtra Weather Update : गेल्या गुरुवार दि. ९ जानेवारीपासून ते आजपर्यंत महाराष्ट्रात केवळ दिवसाच गारवा (Weather) आणि रात्री ऊबदारपणा जाणवला.

Maharashtra Weather Update :  गेल्या गुरुवार दि. ९ जानेवारीपासून ते आजपर्यंत महाराष्ट्रात केवळ दिवसाच गारवा (Weather) आणि रात्री ऊबदारपणा जाणवला. यातून गेले १० दिवस विशेष अशी थंडी जाणवली नाही. आज तर राज्यात रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली येथील पहाटेचे किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्री से. ग्रेडची वाढ जाणवली. परंतु त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी मात्र किमान तापमानात (Temperature) सरासरीपेक्षा १ ते ३ डिग्री से. ग्रेडची घसरणही जाणवली. 

पुढील थंडी कशी असेल?                     उद्या रविवार दि. १९ जानेवारी पासून पुढील १० दिवस म्हणजे मंगळवार दि. २८ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) पहाटे ५ चे किमान तापमानात ४ ते ५ डिग्री से. ग्रेडची घसरण होवून १० ते १२ डिग्री से. ग्रेडपर्यंत स्थिरावण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे आता रात्रीचा सध्याचा ऊबदारपणा कमी होवून, भले कडाक्याची नसली तरी, महाराष्ट्रात उद्यापासून पुढील दहा दिवस, माफक अशा थंडीची शक्यता जाणवते. 

राज्यात थंडीचा प्रभाव कोठे आणि कसा असेल? 

विशेषतः संपूर्ण दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा २३ जिल्ह्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल. तर कोकण, खान्देश, नाशिक नगर, छ.सं नगर अशा १३ जिल्ह्यात किमान तापमान सरासरीइतके किंवा काहीसे किंचित अधिक राहून तेथे केवळ साधारण थंडीचीच शक्यता जाणवते. 

कशामुळे थंडीची शक्यता निर्माण झाली? i) समुद्रसपाटीपासून एक किमी. उंचीपर्यंत गुजराथ पासून राजस्थानपर्यंत सध्याचा तिरपा असलेला कमी दाब क्षेत्राचा आस. ii)  उत्तर भारतात एकापाठोपाठ मार्गस्थ होणारे पश्चिमी प्रकोप आणि अरबी समुद्रातून नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या आर्द्रतेचा पुरवठा यातून तेथे सध्या होणारा पाऊस, बर्फबारी व थंडी. iii) ओरिसावरील उच्चं दाब क्षेत्र आता राजस्थान, मध्यप्रदेशकडे सरकले आहे. त्यामुळे घड्याळ काटा दिशेने वहन होणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तर भारतातील थंडी, बिहार झारखंड मार्गे पूर्वेकडून महाराष्ट्रात खेचल्या जाण्याच्या शक्यतेमुळे आता पुढील १० दिवसात थंडीची शक्यता निर्माण झाली आहे. 

ला-निना व एमजेओ चा परिणाम                  प्रशांत महासागरात सध्या अपेक्षित पण कमकुवत असे 'ला- निना' चे अस्तित्व जरी असले, तरी त्याचे हे अस्तित्व, केवळ जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यासाठीच अल्पजीवी ठरु शकते. एप्रिल नंतर पुन्हा एन्सो तटस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या ला-निनाचे अस्तित्व तसेच भारत महासागरीय विषववृत्तीय परीक्षेत्रात सध्याच्या दोन आठवड्यासाठी संचलनित असलेले एम.जे.ओ. चे अस्तित्वही महाराष्ट्राच्या वातावरणावर विशेष असा कोणताही परिणाम करणार नाही, असे वाटते.

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune

टॅग्स :हवामानशेती क्षेत्रशेतीशेतकरी