महान : तब्बल २७ तास अखंड विसर्ग सुरू ठेवल्यानंतर काटेपूर्णा धरणाचे चारही दरवाजे मंगळवारी (१६ सप्टेंबर) रात्री १०.३० वाजता बंद करण्यात आले. या कालावधीत एकूण १८.९० दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. (Katepurna Dam Update)
गेल्या चार-पाच दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व मालेगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली. (Katepurna Dam Update)
१५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पातळी ९८.०४ टक्क्यांवर पोहोचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी ७.३० वाजता दोन दरवाजे प्रत्येकी दोन फूट उघडण्यात आले.(Katepurna Dam Update)
पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री ८.३० वाजता आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले आणि चार गेटमधून १९७.९२ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. १६ सप्टेंबर दिवसभर धरण परिसरात पाऊस पडत असल्याने विसर्ग कायम ठेवावा लागला.(Katepurna Dam Update)
रात्री उशिरा आवक कमी झाल्यानंतर अखेर २७ तास सतत झालेल्या विसर्गानंतर गेट्स बंद करण्यात आले.(Katepurna Dam Update)
सध्याची पाणीपातळी व जलसाठा
१७ सप्टेंबर रोजी सकाळी धरणाची पाणीपातळी ३४७.५४ मीटर इतकी नोंदली गेली असून, धरणात ८२.६३९ दशलक्ष घनमीटर (९५.७०%) जलसाठा आहे. यंदा धरणस्थळी आतापर्यंत ५२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परिचालन आराखड्यानुसार, धरणात १००% जलसाठा राखीव ठेवून आवक पाहूनच पाण्याचा पुढील विसर्ग केला जाणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांनी दिली. शाखा अभियंता संदीप नेमाडे व कर्मचारी पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून दक्षतेने पाणी व्यवस्थापन करत आहेत.