Join us

उन्हामुळे कांदा पिकावर परिणाम, जानेवारी महिन्यातील कांदा लागवड संकटात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:40 PM

थंडीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम थेट कांदा परिपक्व होण्यावर झाला आहे.

नाशिक : गेल्या दहा-बारा दिवसांपासून लाल रांगडा कांदा काढणीस सुरुवात झाली आहे. परंतु पाहिजे, त्याप्रमाणात त्याला भाव नसल्याने या कांद्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याचे दिसते आहे. थोड्याच दिवसांत मोठ्या प्रमाणात येणारा उन्हाळ कांदाही करपा, उन्हाची तीव्रता, उशिरा आवर्तन, उशिरा लागवड, बेमोसमी पाऊस यांच्या संकटात सापडला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार आहे.

कांद्यावर पडलेला करपा, बोगस बियाणे, पंधरा दिवसांपासून अतिउष्णता व विजेचा तुटवडा यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची होरपळ झाल्याने शेकडो हेक्टरवरील कांदा संकटात सापडल्याने कांदा उत्पादनात घट येणार आहे. पंधरा दिवसांपासून अधूनमधून असलेले ढगाळ वातावरण, वादळी पाऊस, करपा रोग त्याचा परिणाम उन्हाळ कांद्यावर झाला असून, मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. उन्हाळ कांद्याने परिपक्व होण्याअगोदर माना टाकल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होणार असून, मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चातून म्हणावे असे उत्पादन निघणार नसल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

अपरिपक्व कांदा, गारपिटीत सापडलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने त्याचा परिणाम कांदा साठवणुकीवर होणार आहे. यावर्षी मजुरांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा शेतकऱ्यांना आला. चालू हंगाम वाया जातो की काय? या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात मजुरी देऊन कांदा लागवड केली  तसेच अनेक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यात फसवणूक झाली आहे. या संकटाबरोबरच गेली पंधरा दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम थेट कांदा परिपक्व होण्यावर झाला आहे. चार दिवसांनी आठ पाणी द्यावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने पाहणे अभावी कांदा पिकाची होरपळ झाली आहे.

करपासारखे रोग करतात कांद्याचं मोठं नुकसान, उत्पादनातही बसतो फटका, असे करा उपाय

विहिरींची पाणीपातळी घटली

देवळा तालुक्यातील ब्राह्मणगाव व परिसरात विहिरींच्या पाण्याची पातळी घटू लागली आहे. तर दुसरीकडे कांदा निर्यात परवानगी देऊनही कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला असून परिणामतः त्याचा फटका अन्य व्यवसायांवर ही होत असल्याने आर्थिक मंदीमुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. केंद्राने काही ठराविक देशांमध्ये ठराविक लिमिट पर्यंत कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली. यामुळे कांद्याला भाव वाढेल, या आनंदात शेतकरी असताना व कांदा भाव १७००/१८०० पर्यंत जात नाही, तोच गेल्या दोन दिवसापासून कांदा भाव हा परत १२०० पर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांचे आनंदावर पाणी फिरले आहे. 

त्यातच अजून काही ठिकाणी उन्हाळी कांद्याला एक महिना काढणीसाठी वेळ आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी घट्ट लागल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून त्याचा परिणाम अन्य व्यवसायांवर ही झाला आहे. शेतकऱ्यांचे हातात दोन पैसे जास्त आले तरच ग्रामीण अर्थ व्यवस्था बरी असते अन्यथा सर्वच व्यवसाय अडचणीत येत असतात.

ठिकठिकाणी मजुरांची टंचाई

यावर्षी मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई भासल्याने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी उशीर झाल्या. अनेक शेतकऱ्यांना कांद्याच्या रोपाच्याअभावी उशिरा कांद्याची लागवड करावी लागली. जानेवारी महिन्यात कांदा लागवडी केल्या; परंतु त्या कांदा लागवडी अतिउष्ण तापमान, थंडीची कमतरता भासत असल्याने कांद्याची साईज बारीक झाली असून, परिपक्चतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मजुरांच्या टंचाईमुळे यावर्षी उन्हाळ कांदा उशीर झाला, मध्यंतरी फेब्रुवारी महिन्यात वातावरण चांगले असल्याने कांदा पीक सुधारले होते. परंतु दहा-बारा दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे कांदा पीक करपा रोगाच्या विळख्यात सापडले आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डनाशिकतापमान