Join us

Gangapur Dam : गंगापूरसह नांदूरमध्यमेश्वरचा विसर्ग घटला; गोदावरीचा पूर ओसरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:35 IST

Gangapur Dam : पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने गोदावरीला (Godawari River) असलेली पुरस्थिती कमी झाली आहे.

नाशिक : मागील दोन दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने गोदावरीला (Godawari River) असलेली पुरस्थिती कमी झाली आहे. त्यामुळे गंगापुर धरणासह नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुरू असलेल्या विसर्गातही घट करण्यात आली. 

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सुरू असलेला ६ हजार ३३६ क्युसेकचा विसर्ग मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ३ हजार ९६९ क्युसेक करण्यात आला. तर आज सकाळी बारा वाजेपासून पुन्हा घट करण्यात येऊन २२०५ क्युसेक करण्यात आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा पावसाचे प्रमाण मंगळवारी कमी झाले झाल्याने विसर्ग घटविण्यात आला आहे. 

जिल्हाभर जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीनाल्यांना पूरस्थिती निर्माण झाल्याने सर्वच धरणाचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. नांदूर-मधमेश्वर धरणातून सोमवारी ४३ हजार ८८२, तर मंगळवारी विसर्ग कमी करून ३९ हजार क्युसेक करण्यात आला होता. आज बारा वाजता पुन्हा घट करून तो २२ हजार ३४५ क्युसेक करण्यात आला आहे. 

जायकवाडीकडे पाण्याचा मोठा विसर्गजिल्हाभर नदी-नाले गेल्या तीन-चार दिवसांत भरून वाहू लागले आहेत. परिणामी छोटे-मोठे ओहोळ, नदी-नाले खळखळून वाहू लागले असल्याने अनेक नद्यांना पूर आल्याचेदेखील चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी हे गोदावरी नदीत येऊन मिळत असल्याने नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्याच्या वक्राकार गेटद्वारे जायकवाडीकडे पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असतो.

असा सुरु धरणातून विसर्ग 

  • दारणा - ३५३० क्युसेक
  • गंगापूर - २२०५ क्युसेक 
  • नांदूरमध्यमेश्वर - २२ हजार ३४५ क्युसेक 
  • पालखेड -  १३६५ क्युसेक 
  • भाम - १२४५ क्युसेक 
  • कश्यपी - १००० क्युसेक  
टॅग्स :गंगापूर धरणनांदूरमधमेश्वरजायकवाडी धरणपाऊस