Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dam Water Level : अमरावतीत पाण्यासाठी संघर्ष; मराठवाड्यात धरणं तुडुंब- कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:59 IST

Dam Water Level : राज्यात पाण्याचं चित्र सध्या विरोधाभास दाखवत आहे. काही भागात धरणं तुडुंब भरली असताना, तर काही ठिकाणी लोकांना थेंबासाठी झगडावं लागत आहे. जलसंपत्ती असतानाही टंचाई का, हा मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Dam Water Level)

Dam Water Level : जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचे महत्त्व अधोरेखित होत असताना अमरावती जिल्ह्यातील वास्तव मात्र चिंताजनक आहे. (Dam Water Level)

जिल्ह्यात एक मोठा, ७ मध्यम आणि तब्बल ४८ लघू सिंचन प्रकल्प असतानाही उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. (Dam Water Level)

नैसर्गिक जलस्रोत आटत चालले असून जलव्यवस्थापनाचे गंभीर आव्हान समोर उभे ठाकले आहे.

नैसर्गिक स्रोतांचा अस्त

एकेकाळी शहराची तहान भागवणारे छत्रीतलाव आणि वडाळी तलाव आज अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहेत. 

ब्रिटिशकालीन जलपुरवठ्याची परंपरा असलेले हे तलाव सध्या गाळ साचणे आणि वाढत्या शहरीकरणामुळे आपली साठवण क्षमता गमावत आहेत. 

परिणामी, या तलावांतील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. सौंदर्यीकरणावर भर दिला जात असला, तरी जलसाठा वाढवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

पावसाचे पाणी वाहून जाते

जिल्ह्यात सरासरी ८०० मिमी पाऊस पडतो, मात्र त्यातील केवळ १५ ते २० टक्के पाणीच साठवले जाते. उर्वरित पाणी थेट वाहून जात असल्याने जलसंकट अधिक गडद होत आहे. जलपुनर्भरणाच्या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याने भूजल पातळीही झपाट्याने खालावत आहे.

'रेन वॉटर हार्वेस्टिंग' कागदावरच

महानगरपालिका क्षेत्रात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' बंधनकारक असले, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अत्यल्प आहे. खासगी गृहनिर्माण प्रकल्पांमध्येही जलपुनर्भरणाच्या उपाययोजना नगण्य आहेत. त्यामुळे शहरातील जलसंकट अधिक तीव्र होत आहे.

नद्यांवर वाढते अवलंबित्व

पूर्णा, तापी, वर्धा, चंद्रभागा, शहानूर आणि पेढी या नद्यांवर जिल्हा मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मात्र यापैकी मोजक्याच नद्या बारमाही आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होण्याचा धोका कायम आहे.

मराठवाडा मात्र 'पाण्यात'!

दुसरीकडे, मराठवाड्यात यंदा समाधानकारक स्थिती दिसून येत आहे. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये ७ ते १८ टक्के अधिक जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे.

धरणे तुडुंब, टंचाईपासून दिलासा

मार्च महिन्यात साधारणतः पाणीटंचाईची सुरुवात होते; मात्र यंदा बहुतेक धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा उपलब्ध आहे. 

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पासह ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३६४२ दलघमी पाणीसाठा नोंदवला गेला आहे, जो गतवर्षीपेक्षा अधिक आहे.

तसेच ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ५६८ दलघमी पाणी असून, लघू प्रकल्पांची स्थितीही समाधानकारक आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच स्तरांवर जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

'वॉटर फॉर पिस'चा संदेश

२०२६ च्या जागतिक जल दिनाचे घोषवाक्य 'वॉटर फॉर पिस' असे आहे. पाणी हे केवळ जीवनाचे स्रोत नसून शांतता आणि समृद्धीचे साधन आहे, हा संदेश देणारे हे घोषवाक्य सध्याच्या परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरते.

गत वर्षीच्या तुलनेत आकडेवारीची स्थिती

प्रकल्प प्रकारसंख्या२०२६ जलसाठा (%)२०२५ जलसाठा (%)
मोठे प्रकल्प११७०%६३%
मध्यम प्रकल्प७५६०%८८%
लघू प्रकल्प७५८५०%३२%

अमरावतीसारख्या जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या मोठी असूनही प्रभावी जलव्यवस्थापनाचा अभाव जाणवतो, तर मराठवाड्यात चांगल्या पावसामुळे पाणीसाठा मुबलक आहे. ही दरी कमी करण्यासाठी जलसाठवण, पुनर्भरण आणि नियोजनबद्ध वापर यावर तातडीने भर देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Vidarbha River Linking Project : 'वैनगंगा-नळगंगा' प्रकल्पात बदल; कामाला गती देण्यासाठी सरकारची नवी रणनीती

अधिक वाचा : Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र!

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati faces water scarcity while Marathwada dams overflow: Reasons why.

Web Summary : Amravati struggles with water scarcity despite irrigation projects, while Marathwada dams are full due to heavy rains. Poor water management exacerbates Amravati's crisis. Marathwada enjoys ample water storage, offering relief from potential water shortages. Experts stress better water conservation.
टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीजायकवाडी धरण