चक्रवादळे व थंडी - बं.उपसागरात 'सेन-यार' व 'दिट-वाह' अश्या दोन चक्री वादळांची निर्मिती होऊनही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चढ-उतारासहित (म्हणजे काल दि.७ डिसेंबर संकष्ट चतुर्थीपर्यंत) महाराष्ट्रात अपेक्षित थंडी अनुभवली गेली.
पुढील थंडी आजपासुन पुढील १२ दिवस म्हणजे १९ डिसेंबर(मार्गशीर्ष दर्शवेळ आमावस्ये)पर्यन्त महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवेल, असे वाटते. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नाशिक, छ. सं. नगरसह खान्देश, मराठवाडा विदर्भाच्या काही भागात रात्री थंडीच्या लाटेसह तर दिवसा थंड दिवसामुळे हूडहुडीचा अनुभव येऊ शकतो. मुंबईसह कोकणात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके जाणवू शकते, असे वाटते.
सध्याची अति तीव्र थंडीची लाट
मालेगांव (नाशिक) किमान तापमान ९.०(-१०.७), कमाल तापमान २६.८(-५.२) सध्याची थंडीची लाट : अमरावती - ९.६(-४.९), यवतमाळ ८.८ (-५.७) सध्याची थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती - गोंदिया- ९.०(-४.१), वाशिम ११.४(-५.८)
एकांकी किमान तापमान व केवळ जाणवणारी थंडी- अहिल्यानगर ९.५, जळगांव ९.४, जेऊर ९.०, छ. सं. नगर १०, नांदेड ९.९, नागपूर ९.६ थंडीची शक्यता कशामुळे- (i) उत्तर भारतातून येणारे ईशान्यई वारे महाराष्ट्रात पूर्वीय होत असून हवेचा दाब ही पूर्ववत म्हणजे १०१६ हेक्टपास्कल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते. (ii) दक्षिण भारतातील ईशान्य (हिवाळी) मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी होण्याच्या शक्यतेमुळे तेथील हंगामी पूर्वीय वारे १३ अंश अक्षवृत्ता दरम्यानच मर्यादित राहण्याच्या शक्यतेमुळे, उत्तर भारतातुन महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीला अटकाव होण्याची शक्यता नाही. (iii) वायव्य आशियातून, सध्या उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी (झंजावात) प्रकोप त्यामुळे थंड ईशान्यई वारे महाराष्ट्राकडे झेपावत आहे. (iv) समुद्रसपाटी पासून साडेबारा किमी.उंचीपासून ते पार साडेचार किमी उंचीपर्यन वरून खाली (व्हर्टिकली डाऊन) टप्प्याटप्प्याने सरकलेले वेगवान पश्चिमी अतिथंड कोरडे वाऱ्यांचा झोता (जेट स्ट्रीम) चा पट्टा उत्तर भारताकडून दक्षिणेकडे (हॉरिझॉनंटली लॅटरल) म्हणजे ३९ डिग्री उत्तर पासून ते पार २२ डिग्री उत्तर अक्षवृत्तपर्यंत रुंदावल्यामुळे महाराष्ट्रात थंडीची शक्यता जाणवते.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.