Join us

जिथं तीन धरणं शंभर टक्के भरली, तिथंच दीड महिन्यांपासून पाऊस नाही, पिकेही सुकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:45 IST

Agriculture News : जमिनीला भेगा पडल्या असून पिकेही सुकली आहेत, अशा परिस्थितीत चातकाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. 

Agriculture News : 'वर आभाळ कोपलं, खाली भेगाळली भूई, मातीत मरणारांना कुणी वाली उरला नाही..' या ओळी आहेत, कवी, शिक्षक लक्ष्मण खेडकर यांच्या. मूळचे मुंगुसवाडे जिल्हा अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील असलेल्या खेडकर गुरुजींच्या गावी दीड महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. जमिनीला भेगा पडल्या असून पिकेही सुकली आहेत, अशा परिस्थितीत चातकाप्रमाणे ते आणि त्यांच्यासह परिसरातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. 

राज्यातील बहुतांश भागात जून महिन्यांसह जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुरही येऊन गेले. धरणे काठोकाठ भरली आहे. मात्र आजही अनेक भागात पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अनेक गावे पावसाच्या पाण्यासाठी आसुसलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याच जिल्ह्यातील तीन धरणं शंभर टक्के भरली असूनही या भागातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. 

खेडकर गुरुजी म्हणतात, 'गेल्या महिना सव्वा महिन्यापासून पावसाचा थेंब नाहीय, उन्हाळ्या सारखं ऊन पडतयं. वावरातली पिक वाळून चाललीत, नद्या ,नाले विहिरी कोरडेठाक आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला असून दुसरीकडे चारा टंचाईचं संकट घोंगावत आहे. मुख्य म्हणजे खरिपाच्या ऐन भरात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.' 

सद्यस्थितीत हवामान विभागाने आजपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश आहे. ज्या भागात खऱ्या अर्थाने पावसाची गरज आहे, अशा ठिकाणी पावसाने कोसळणे गरजेचे आहे. जवळपास दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने खरिपातील पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असून अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. 

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रशेतीहवामान अंदाजअहिल्यानगर