Join us

ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 3:41 PM

ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्र ओसंडून दुथडी वाहत असल्याने कृष्णा काठावरील शेतकऱ्यांत आनंदाची पर्वणी तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोयना धरणातून प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे.

ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्र ओसंडून दुथडी वाहत असल्याने कृष्णा काठावरील शेतकऱ्यांत आनंदाची पर्वणी तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोयना धरणातून प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कृष्णाकाठावरील उपसा सिंचन योजना व पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मार्गी लागला आहे.

जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ्याची दाहकता वाढत आहे. वातावरणातील उष्णता वाढल्याने सूर्य आग ओकतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमानाने ४० अंशांचा पारा गाठला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातीच्या पूर्व भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी व विहिरींनी तळ गाठला आहे.

ओढे ठणठणीत कोरडे पडले आहेत. जमिनींच्या भेगा पाण्याची गंभीरता दर्शवित आहे. आशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शेतीसाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कृष्णा नदी पात्रात, मात्र पाणीच पाणी वाहत आहे. कृष्णा नदी ओसंडून दुथडी वाहत आहे. यासाठी पाटबंधारे विभागाकडून योग्य खबरदारी घेऊन कोयना धरणाच्या पूर्वेकडील भागात सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊन नये यासाठी सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरण व्यवस्थापनाला पाण्याची मागणी केली होती.

यावर प्रशासनाने आपत्कालीन दरवाजातून अतिरिक्त पाणी प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक इतके नदी पात्रात पाणी सोडल्याची माहिती दिली यामुळे शेतातील केळी, आडसाली ऊस, सुरुच्या ऊस लागणी, चाऱ्यासाठी लावलेला मका कडवळ, गवत या व अशा अनेक पिकांना जीवदान मिळाले आहे. कृष्णा काठावर गुढीपाडव्याच्या सनाला व ऐन उन्हाळ्यात ओसंडून पाणी मिळल्याने जनता आनंदात दिसत आहे.

बळीराजा सुखावलाऐन उन्हाळ्यात नदीला भरपूर पाणी असल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत असल्याने कृष्णाकाठावर गुढीपाडवा आनंदात साजरा केला गेला.नदीपात्रात गुढ्या धुण्यासाठी नदी काठावरील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते.

टॅग्स :कोयना धरणनदीशेतकरीशेतीऊसकेळीधरण