Join us

Jayakwadi Dam Water : नाथसागरातील पाण्याचे आवर्तन जाहीर ; रब्बीतील पिकांना मिळणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:35 IST

जायकवाडी प्रकल्पातून एकूण चार, निम्न दुधना प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी अवर्तन जाहीर करण्यात आले आहे. (Jayakwadi Dam Water)

Jayakwadi Dam  Water :  रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने जायकवाडीतून सोमवारी रात्री तर निम्न दुधना प्रकल्पातून मंगळवारी सकाळी पहिले आवर्तन कालव्यात सोडण्यात आले आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निम्न दुधना, पूर्णा व जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांना पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये जायकवाडी प्रकल्पातून एकूण चार, निम्न दुधना प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी तीन व येलदरी व सिद्धेश्वर धरण अंतर्गत येणाऱ्या पूर्णा प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने चार पाणी आवर्तने देण्यात येणार आहेत. त्यातील पहिले आवर्तन तिन्ही प्रकल्पातून मंगळवारपर्यंत सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

पैठण नाथसागर शंभर टक्के भरले असून डाव्या कालव्याचे काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. डाव्या कालव्याअंतर्गत येणाऱ्या पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, पाथरी, मानवत, परभणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उभ्या असलेल्या उसाच्या पिकांना व नवीन लागवड करायची असलेल्या उसासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे.

शेतकऱ्यांची होती मागणी

• निम्न दुधना त्याचबरोबर जायकवाडी व पूर्णा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामासाठी पाणी पाळी सोडण्यात यावी, यासाठी मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती.

• या अनुषंगाने 'लोकमत ऍग्रो' कडून बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावाही करण्यात आला. सोमवारी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीतून २६ नोव्हेंबर पासून पहिली पाणी पाळी सोडण्याचे आदेश देण्यात आले.

जायकवाडीतून ९७ हजार हेक्टरचे होणार सिंचन

• परभणी जिल्ह्यामध्ये जायकवाडी कालव्यावर ९७ हजार ४४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. तर निम्न दुधना प्रकल्पांतर्गत परभणी व जालना जिल्ह्यातील ३४ हजार ४३८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.

• परभणी जिल्ह्यातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रतिपादन केले. त्यानुसार सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सुटणार आहे.

निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा

* निम्न दुधना प्रकल्पामध्ये १८१.७८० दलघमी म्हणजेच ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक, मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेरपर्यंत पाणी पुरेल याचे नियोजन केले आहे.

* त्याचबरोबर रब्बी व उन्हाळी हंगामात तीन पाणी आवर्तने देण्यात येणार आहेत. कालव्याव्दारे रब्बीचे पहिले आवर्तन आज मंगळवारी संध्याकाळपर्यंत सोडण्यात येणार आहे. जालना, परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा यांचा फायदा होणार आहे.

पुलाच्या कामामुळे कालव्याला पाणी नाही

* डाव्या कालव्यावरील पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम सुरू आहे.

* पुलाचे काम पूर्ण काढण्याचे झाले तरच मंगळवारी सकाळी सहा वाजता डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी 'लोकमत ऍग्रो' शी बोलताना सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणपाणीशेतकरीशेती