Join us

Weather : राज्यात पुढील पाच दिवस हवामान कसं असेल? पावसाचा अंदाज काय? 

By गोकुळ पवार | Updated: November 28, 2023 13:43 IST

Weather : पुढील पाच दिवस देखील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Weather Report : मागील दोन दिवस अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश भागात हजेरी लावत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. नाशिकसह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले. आता यापुढील पाच दिवस देखील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नसली तरीही 2 डिसेंबर पर्यंत ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान पाहायला मिळत होते. त्यानंतर अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आज सकाळपासून वातावरण निवळले असले तरीही सकाळी दाट धुके दाटल्याचे पाहायला मिळेल. दरम्यान निवृत्त हवामान तज्ञ खुळे यांच्या अंदाजानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात केवळ विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. पण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. तर 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता आहे.  

दरम्यान शनिवार दि.2 डिसेंबर पासून प्रणाली विरळ होवून वातावरण निवळण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असुन ते बांगलादेशकडे मार्गस्थ होण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही, असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच 29 नोव्हेंबरपासून मात्र हळूहळू गुलाबी थंडी जाणवण्यास सुरवात होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :हवामाननाशिकपाऊस