Join us

राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती पाणी उरलंय? जाणून घ्या विभागनिहाय उपलब्धता

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 04, 2024 11:09 AM

पावसाळ्यापूर्वी उन्हाळी हंगाम संपण्यास अजून दोन महिने बाकी असताना पाणीटंचाईचे मोठे संकट राज्यावर आहे.

Dam water Storage: एकीकडे राज्यात तापमान वेगाने वाढत असताना धरणसाठाही तेवढ्याच वेगात कमी होत आहे. आज दिनांक चार एप्रिल रोजी राज्यात सरासरी धरण साठा 36.71 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यापूर्वी उन्हाळी हंगाम संपण्यास अजून दोन महिने बाकी असताना पाणीटंचाईचे मोठे संकट राज्यावर आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असून विहिरीतला व इतर जलसाठे कोरडे होत आहेत.

जलसाठ्यांमधून अवैध उपसा थांबवण्यासाठी जलाशयांवर भरारी पथके नेमण्यात येत आहेत. मराठवाडा विदर्भासह बहुतांश ठिकाणी टँकर सुरू झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सिंचनासाठी शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे.

दरम्यान राज्यातील सहा विभागांमध्ये आज 36.71% जिवंत पाणीसाठा असून 14,862 दलघमी पाणी शिल्लक आहे.नाशिक विभागातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये 37.54% पाणीसाठा उपलब्ध असून 228.16 दलघमी पाणी शिल्लक आहे. पुणे विभागातील 720 धरणांचा पाणीसाठा आता 35.30 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

विदर्भ मराठवाड्यात काय स्थिती?

नागपूर विभागातील पाणीसाठा आता 48.24 टक्क्यांवर गेला असून अमरावती विभागात 48.62% पाणी शिल्लक आहे.मराठवाड्यात औरंगाबाद विभागातील 920 धरणांमध्ये आता केवळ 18.90% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी हा साठा 53.2% एवढा होता.

कोकण विभागात एकूण 173 प्रकल्पांमध्ये आता 49.62% पाणी शिल्लक आहे. 

बाष्पीभवनाचा वेग वाढला

वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी कमी होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन महिन्यात राज्यात ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असून तापमानाचा पारा वाढणार आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईपाणीकपात