Join us
Daily Top 2Weekly Top 5

जूनच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधारा, कुठे होणार पाऊस?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: May 29, 2024 13:54 IST

प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला अंदाज

राज्यात उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे नागरिक हैराण झाले असून मान्सूनची सर्वांना आतूरता आहे. हवमान विभागाने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात ७ जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असली तरी १ व २ जुन रोजी मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये १ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २ जून रोजी नांदेडसह लातूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेच्या पावसाची शक्यता आहे. यावेळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० कि.मी राहणार असून हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

मराठवाड्यात तापमान घसरणार

मागील आठवड्याच्या तुलनेत मराठवाड्यात १ ते २ अंशांची घट झालेली पहायला मिळत असून येत्या काही दिवसात तापमान काही अंशी उतरेल. सध्या ३७ ते ४१ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद होत असून उकाड्याने अंगाची लाही लाही होत आहे.

अवकाळीने मराठवाड्यात नुकसान

गेल्या दोन दिवसात मराठवाड्यातील काही भागात आवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या ४८ तासांत एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच २४.३ हेक्टर जमिनीवर पिके उद्ध्वस्त झाली. पावसामुळे ५३ जनावरे दगावल्याचे पीटीआयने सांगितले.

टॅग्स :पाऊसहवामानमराठवाडा