Join us

Dam storage: विष्णुपूरी धरणात आता केवळ ४० टक्के पाणीसाठा, येलदरी, सिद्धेश्वरमध्ये काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 4:27 PM

नांदेड, हिंगोलीतील धरणांमध्ये पाणीसाठा वेगाने घटतोय, नागरिकांना जावे लागणार पाणीटंचाईला सामोरे..

नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार विष्णुपुरी प्रकल्पात ४० टक्के, तर परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे नांदेडसह शेजारच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यामध्ये सर्वच ठिकाणी पाणी टंचाई वाढते. मागील काही वर्षांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली होती; मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जमा झाला नाही. नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्के पाणीसाठा देखील शिल्लक नाही. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते, त्यातच बाष्पीभवनही वाढते. त्यामुळे पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पामध्ये ३२.६९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ४०.४६ एवढी आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच तारखेला विष्णुपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. अशीच परिस्थिती परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पाची आहे. येलदरी प्रकल्पात केवळ ३१.१५ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. ९३४ दलघमी साठवण क्षमता असणाऱ्या या प्रकल्पात सध्या २५२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. इसापूर प्रकल्पात ४४.४१ टक्के पाणीसाठा आहे. ४२८ दलघमी पाणीसाठा या प्रकल्पात सद्यः स्थितीला आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात झालेली घट तिन्ही जिल्ह्यांची चिंता वाढविणारी ठरणार आहे. उन्हाळ्यातील संपूर्ण मे महिना अद्याप शिल्लक असून, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

प्रकल्पांत सरासरी ३६ टक्के पाणी

नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीला सरासरी ३६,५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, लघुप्रकल्पांमध्ये मिळून २२७ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. क्षमतेच्या ३१ टक्के हा साठा आहे. 

हिंगोली जिल्ह्यात ४६ टक्के, परभणी जिल्ह्यात ११.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूण सर्व प्रकल्पांची सरासरी काढली तर ३६.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मोठ्या प्रकल्पांतील पाण्याची टक्केवारी

प्रकल्प             यावर्षी        गतवर्षी

विष्णुपुरी           ४०.४६      ७५.८०

मानार               २९.२१           ४२.७५

येलदरी              ३१.१५          ६५.३४

इसापूर              ४४.४१          ५९.७५

सिद्धेश्वर             ४४.८४         ४९.९६

टॅग्स :विष्णुपुरी धरणधरणपाणीपाणीकपात