हवामान विभागाने आठवडाभर तापमानात वाढ होऊन थंडीत घट व वातावरण उबदार होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, अंदाजाच्या विपरीत रविवारी तापमान मोठ्या फरकाने घसरले व थंडीत वाढ झाली आहे. नागपूरचे किमान तापमान ११.८ अंश नोंदविण्यात आले.
मागील संपूर्ण आठवडा नागपूरकरांना थंडीने छळले. ११ ते १८ डिसेंबरपर्यंत तापमान १० अंशाच्या खाली घसरले होते. १५ डिसेंबरला यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी ७ अंश तापमानाची नोंद झाली होती. उत्तर भारतात थंडीची जबरदस्त लाट आल्याने उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नागपूरसह विदर्भातही थंड लाटेची स्थिती निर्माण झाली होती.
२० डिसेंबरला मात्र रात्रीचा पारा १६ अंशावर चढला. ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. हा उबदारपणा पुढचा आठवडाभर राहणार, असा हवामान खात्याचा अंदाज होता. शनिवारी १५.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारी मात्र पारा ४ अंशाने खाली पडला व ११.८ अंशाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा अंशतः कमी आहे.
दरम्यान, नव्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची व तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याचीही शक्यता आहे. तापमानात मात्र चढउतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात