Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, राज्यातील या भागात उष्णतेची लाट

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 18, 2024 09:33 IST

जाणून घ्या हवामान विभागाचा सविस्तर अंदाज

मागील चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दिवसभर तीव्र ऊन आणि सायंकाळी पाऊस असे वातावरण राज्यात पहायला मिळाले.  

बुधवारी राज्यात  बहुतांश भागात ४२ ते ४३ अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

इराण व परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागात सक्रीय असल्याने राज्यात सध्या अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

विदर्भासह  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात  १८ ते २२ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहणार आहे.

यलो अलर्ट कुठे?

रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, जळगाव, बीड, धाराशिव,लातूर, नांदेड, सोलापूर

उष्णतेच्या लाटेचा अंदाज

राज्यात तापमान वाढत असून १९ ते २१ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता देण्यात आली आहे. कोकण आणि गोव्यात उष्ण व आर्दता राहणार असून आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रात्र उष्ण राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानतापमानउष्माघात