Join us
Daily Top 2Weekly Top 5

'येणाऱ्या २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा थंडीची शक्यता' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 18:42 IST

उत्तर भारतात एकापाठोपाठ कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रमण करणाऱ्या तीव्र पश्चिम झंजावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे.

मंगळवार दि.१३ फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असतांना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची आणि भले अल्पसी व चढ-उतारासहित का होईना पण शेतपिके व फळबागांना लाभदायक ठरु पाहणारी, फेब्रुवारीअखेर पर्यंतची हिवाळ्यातील थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करणार की काय, असे वाटू लागले आहे. 

कश्यामुळे हे घडते आहे?

  • उत्तर भारतात एकापाठोपाठ कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रमण करणाऱ्या तीव्र पश्चिम झंजावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे. उत्तर भारतात त्यामुळे धुक्याचे प्रमाणही आता कमी होवून दृश्यमानताही तेथे सुधारली आहे.
  • संपूर्ण उत्तर भारतात आजपासून पुढील ५ दिवस म्हणजे २२ फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी झंजावात व त्याचबरोबर मध्य-भारत स्थित 'प्रत्यावर्ती वारा पॅटर्न'च्या बदलातून तेथे पुन्हा जोरदार पाऊस, जबरदस्त बर्फबारी व गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. 
  • तसेच संपूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्रातील खांदेशातील अक्षवृत्तपर्यंत, समुद्रसपाटी पासून साडेबारा किमी. उंचीवर, पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २७० किमी अतिवेगवान प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वाऱ्यांचे वहन अजुनही टिकून आहे.
  • कर्नाटक किनारपट्टी ते खान्देश पर्यन्त समुद्रसपाटी पासून साधारण १ किमी. उंचीपर्यंत पसरलेला हवेचा कमी दाबाचा आस        

                       ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा खंडीत का होईना पण स्रोत टिकून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात, त्यामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सोलापूर पर्यंतच्या ७+१०=१७ जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांच्या शक्यतेमुळे, पहाटेच्या किमान तापमानात घट होवून, दि. २१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या ३ दिवसात पुन्हा ह्या वरील १७ जिल्ह्यात मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे. 

मराठवाडा व विदर्भात मात्र, दरम्यानच्या काळात, पहाटेचे किमान तापमान, सरासरीइतकेच राहून, तेथे त्या प्रमाणातच थंडी जाणवेल.                        

त्याचबरोबर वरील वातावरणीय परिणामातून जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मधील पर्यटन पुढील ५ दिवस म्हणजे २२ फेब्रुवारी पर्यंत, गैरसोयीचे व त्रासदायक ठरु शकते, ह्याचीही नोंद पर्यटकांनी घ्यावी असे वाटते. 

- माणिकराव खुळे, Meteorologist (Retd) IMD Pune

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान