Join us

पंधरा दिवसानंतर तारूगव्हाण बंधाऱ्यात ०.५८ दलघमी पाणी दाखल !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 9:25 AM

या बंधाऱ्यात ३ दिवसांत पाणी सोडले जाणार,पुढील काही दिवस या भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

माजलगाव धरणातून सोडण्यात आलेले पाणी गोदावरी नदीच्या पात्रातील कोरड्या पडलेल्या तारूगव्हाण बंधाऱ्यामध्ये शुक्रवारी दाखल झाले. पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर बंधाऱ्यात ०.५८ दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस या भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जनावरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील तारूगव्हाण मुद्गल आणि ढालेगाव हे तिन्ही बंधारे कोरडे पडले आहेत. यामुळे या भागात जनावरांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला. तारूगव्हाण बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी झाल्यानंतर माजलगाव धरणातून उजव्यामधून ३.५६ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. सोडण्यात आलेले पाणी उजव्या कालव्यामधून माजलगाव तालुक्यातील काही भागांत तसेच ओढ्या-नाल्यातून तालुका बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल पंधरा दिवस कालावधी लागला.

तारूगव्हाण बंधाऱ्यासाठी ०.५६ दलघमी पाणी मंजूर करण्यात आले होते. तो पाणीसाठा १२ एप्रिल शुक्रवारी सकाळी पाणी तारूगव्हाण बंधाऱ्यात पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात काही दिवस दिलासा मिळाला आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील प्रमुख बंधाऱ्यांनी एप्रिलमध्येच तळ गाठला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर सिंचन क्षेत्राला यंदा मोठा फटका बसला आहे. येणाऱ्या काळात स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

ढालेगाव बंधाऱ्यात ३ दिवसांत पाणी सोडले जाणार

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परळी थर्मलसाठी सध्या पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यातूनच तीन दिवसांत ढालेगाव बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जायकवाडी उपविभाग पाथरीच्या उपअभियंत्यांनी 'लोकमत'ला दिली.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईमाजलगाव धरण