Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ukai Dam : उकाई धरणातून 107 गावांना पाच टीएमसी पाणी मिळणार, अशी आहे गावांची यादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:06 IST

Ukai Dam : आगामी १५ दिवसांत मिळाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात उकाई पाणी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नंदुरबार : गुजरात राज्यातील तापी नदीवरच्या उकाई धरणातून पाच टीएमसी पाणीनंदुरबार जिल्ह्यातील १०७ गावांना देण्याचा सामंजस्य करार २०१५ मध्ये करण्यात आला आहे. 

या कराराच्या प्रक्रियेला गती मिळाली असून महाराष्ट्र राज्य शासनाने गुजरात राज्याला पाण्याची उचल करण्याची परवानगी देण्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी देण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ही एनओसी आगामी १५ दिवसांत मिळाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात उकाई पाणी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

उकाई धरणातील जलाशयातून महाराष्ट्रातील सरदार सरोवर प्रकल्पबाधितांना पाच टीमसी पाणी देण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र शासनाकडून सामंजस्य करार झाला आहे. कराराच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांकडून सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत होता. या पत्रव्यवहाराला गुजरात सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. 

एकीकडे हा प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्र शासनाने हे पाणी उपसा सिंचनाद्वारे नंदुरबार जिल्ह्यात आणण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले गेले आहे. या अंदापत्रकानुसार नंदुरबार, नवापूर आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यांतील १०७ गावांना पाणी पोहोचते करण्याचे निश्चित झाले आहे. कामाला अडथळा हा गुजरात राज्याच्या एनओसीचा होता. येत्या काही दिवसांत एनओसी दिल्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र हद्दीत तीन ठिकाणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून पाइपांद्वारे पाणी महाराष्ट्रात येणार आहे.

९५७ कोटींचे अंदाजपत्रकउकाई धरणाच्या जलाशयातून नंदुरबार तालुक्यातील ६४, नवापूर १० तर अक्कलकुवा तालुक्यातील ३२ गावांमध्ये पाणी दिले जाणार आहे. यासाठी लागणारी उपसा सिंचन सामुग्री आणि पाइप यासाठी ९५७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या तापी पाटबंधारे विकास महामंडळाने प्रशासकीय मान्यतेसाठी हे अंदाजपत्रक २०२२ साली दिले आहे. महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पंपगृह उभारणीसाठी लागणारे ना-हरकतचे पत्र देण्यात आले आहे.

तीन ठिकाणी उभारले जाणार मोठमोठे पंपगृहपाच टीमसी पाण्याचा उपसा करण्यासाठी गुजरात राज्यातील वेलदा (जि. तापी) व डोंगरीपाडा (जि. नर्मदा) या दोन ठिकाणांसह महाराष्ट्र हद्दीत करंजवेल (ता. नवापूर) येथे पंपगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणाहून उपसा केलेले पाणी नंदुरबार, नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यांतील गावांमध्ये पोहोचणार आहे.

नंदुरबार तालुक्यातील धानोरा, भवानीपाडा, करंजवे, ईसाईनगर, मालपूर, भांगडा, वसलाई, शिंदे, शिवपूर, शेजवे, व्याहूर, धुळवद, पथराई, कोठडे, वाघशेपा, कोठली, लोय, वेळावद, गुजर जांभोली, आडची, धमडाई, घुली, वरुळ, पळाशी, कोळदे, बामडोद, वाघोदा, राकसवाडे, थामडोद, खोंौंडामळी, राजापूर पिंपळोद, उमरगाव, देवपूर, नटावद, नंदपूर, तारापूर, मंगरुळ, गुजर भवाली, सुंददें, नळवे बुद्रुक आणि खुर्द, लोणखेडा.

अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा, पोरांबी, रांझणी, रतनबारा, रोजकुंड, रैंठी, शितलपाणी, आमलीफळी, छोटा उदेपूर, डोडवा, डोंगरीपाडा, गव्हाळी, गुलीउंबर, काकडीआंबा, धुनशी, काकडखुंट, सिंदवाही, तालंबा, उदेपूर मोठे, उमरकुवा वडली, खडकुना, कोराई, लालपूर, महूखाडी, मंडारा, मोरंबा, महूपाडा, नवागाव, जांभापाणी, नवापूर तालुक्यातील आमलाण, बिलगव्हाण, मेणतलाव, नवागाव, उमराण, पाचंबा, वाटवी, कंरजवेल, डोकारे आणि सुकवेल्ल या गावांपर्यंत उपसा केलेले उकाईचे पाणी पोहोचणार आहे.

उकाई धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. गुजरात सरकारने एनओसी दिल्यानंतर पुढील कामांना सुरुवात होईल. सर्वेक्षणानंतर योजनेसाठी लागणारे पंपगृह उभारणीसाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचे पत्र उकाई मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले गेले आहे.- डॉ. विजयकुमार गावित, आमदार, नंदुरबार.

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीनंदुरबार