रमेश वारकेबोरवडे : अपवादात्मक परिस्थिती सोडली, तर सध्याचे तरुण शेतीमध्ये कष्ट करायला कमी पडलेले दिसतात.
परंतु, उंदरवाडी (ता. कागल) येथील अमित पाटील या ३० वर्षाच्या तरुणाने मुरमाड जमिनीमध्ये यशस्वी प्रयोग करीत ५२ गुंठे जमिनीमध्ये ८८ टन उसाचे उत्पादन घेतले आहे.
मंडलिक साखर कारखान्यात क्लार्क म्हणून कार्यरत असणाऱ्या अमित पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण आहे. अनेक वर्षे कमी पाणी असणारे गाव म्हणून उंदरवाडीची ओळख आहे.
अलीकडच्या काही वर्षांत काळम्मावाडी धरणाच्या पाण्यामुळे येथे ऊस पिकाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढला आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे या भागातील उसाचे उत्पादन हे जास्तीत जास्त एकरी ४० ते ५० टन इतकेच असते.
उंदरवाडी गावातील शेतकरी अमित पाटील यांनी शेतीतज्ज्ञ डॉ. विनायक फासके आणि सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मसू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरमाड आणि तांबूळ माती असलेल्या जमिनीमध्ये पीक घेऊन एकरी ७० टनाच्या सरासरीने ५२ गुंठ्यांमध्ये ८८ टन ऊस उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
एका उसाला सरासरी ३५ इतकी पेरे आहेत. कमी उत्पादनखर्च, जास्तीत जास्त शेणखतांचा वापर, मर्यादित रासायनिक खतांचा वापर, वेळोवेळी घेतलेली आळवणी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करून जास्तीत जास्त उत्पादन घेतल्याचे अमित पाटील यांनी सांगितले. ऊसशेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाटील यांचा प्रयोग आदर्शवत आहे.
अतिवृष्टी तसेच कोल्ह्यांकडून नुकसान झाल्यामुळे उसाचे उत्पादन जेवढे हवे तेवढे झाले नाही, तरीही योग्य व्यवस्थापनामुळे जास्तीत जास्त उत्पन्न मिळविता आले. डोंगरमाथ्यावरील जमीनही पाण्याखाली आणून तिथे अशा प्रयोगाचा मानस आहे. - अमित पाटील, शेतकरी उंदरवाडी
अधिक वाचा: शेतकरी विनायक यांनी एकरी १३० टन ऊस उत्पादनाचे स्वतःचेच रेकॉर्ड तोडले; यंदा किती टन उत्पादन