Join us

वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल; सहापट उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीने केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:34 AM

स्ट्रॉबेरी म्हटलं की ती लाल हा वर्षानुवर्षांचा समज आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील फुलेनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन काही हटके प्रयोग केला आहे.

प्रगती जाधव-पाटीलसातारा : स्ट्रॉबेरी म्हटलं की ती लाल हा वर्षानुवर्षांचा समज आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील फुलेनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन काही हटके प्रयोग करण्याच्या उद्देशाने या स्ट्रॉबेरीची लागवड केल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

शेतात उत्पन्न घेताना ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करून त्यानुसार पीक पद्धती ठरवणे म्हणजे उत्तम अर्थकारण जमणं असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर पिकांना प्राधान्य देण्यापेक्षा शेतीत नवे प्रयोग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा प्रगतशील शेतकरी उमेश खामकर यांनी निवडला. नोव्हेंबर २०२३ मध्ये वीस गुंठ्याच्या क्षेत्रात खामकर यांनी दहा हजार रोपे लावली.

यातून जानेवारी महिन्यात उत्पन्नास सुरुवात झाली. साताऱ्यासह अन्य ठिकाणीही त्यांनी ही फळे विक्रीसाठी ठेवली आहेत. लवकरच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही ही विक्री होणार आहे. विशेष म्हणजे अडीचशे रुपये किलोने सामान्य स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्यापेक्षा सहापट उत्पन्न पांढरी स्ट्रॉबेरी देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

देशातील पहिला प्रयोग वाईतफ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे पीक पहिल्यांदा अमेरिका आणि युकेमध्ये घेण्यात आले. याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. भारतात मात्र हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न उमेश खामकर यांनी केला. यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राइट्स त्यांनी विकत घेतले. त्यामुळे भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर त्यासाठी खामकर यांची परवानगी लागणार आहे.

सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरीच्या या जातीवाई, महाबळेश्वर, पाचगणी यानंतर कोरेगाव आणि पाटण तालुक्यातील घेण्याचे यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांनी केले. साताऱ्यात एलियाना आणि स्वीट चार्ली या दोन प्रकारच्या स्ट्रॉबेरींना मागणी होती. स्वीट चार्ली बंद झाल्यानंतर २०१७ मध्ये स्वीट सेन्सेशन २०१९ मध्ये ब्रिलियन्स आणि २०२३ मध्ये फॅलेसिटी या जातीच्या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली. फ्लोरिडा पर्ल या जातीने स्ट्रॉबेरी व्यवसायाला नवे परिमाण दिले आहेत.

फ्लोरिडा पर्लची खासियतस्ट्रॉबेरी म्हटलं की आंबटपणा अगदी ठरलेला असतो याला अपवाद आहे. अन्य स्ट्रॉबेरीच्या जातींच्या तुलनेत ही नैसर्गिक दृष्ट्या गोड स्ट्रॉबेरी आहे. यातील पौष्टिक मूल्यांमध्ये मुळे ही स्ट्रॉबेरी आरोग्यदायी सुद्धा आहे. नैसर्गिक आंबटपणा कमी असल्यामुळे ही स्ट्रॉबेरी अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

स्ट्रॉबेरीचा ग्राहक लक्षात घेता त्यांना नवनवीन प्रकारच्या स्ट्रॉबेरी खाण्यामध्ये अधिक रस असतो. वर्षानुवर्ष लाल चुटुक स्ट्रॉबेरी खाणाऱ्या ग्राहकाला फ्लोरिडा पर्ल निश्चितच आकर्षित करणारी आहे. सुरुवातीला पांढरी आणि पिकली कि फिकट गुलाबी रंग देणारी ही स्ट्रॉबेरी विदेशात अनेकांना भावली. भारतातही याला उत्तम प्रतिसाद मिळेल. - उमेश खामकर, प्रगतशील शेतकरी फुलेनगर, वाई

टॅग्स :शेतकरीशेतीसातारावाईपीकफलोत्पादनफळे