दयानंद काळुंखे
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील विजयालक्ष्मी सुभाषचंद्र कुताडे यांनी 'चूल आणि मूल' या पारंपरिक चौकटीला छेद देत प्रगतीचे एक नवे दालन खुले केले आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या विजयालक्ष्मी यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर दुग्ध व्यवसायाचे एक मोठे जाळे विणले असून, आज त्या महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई करत ग्रामीण महिलांसमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
विजयालक्ष्मी यापूर्वी केवळ गृहिणी म्हणून काम पाहत होत्या पती राजकारण आणि समाजकारणात व्यस्त असल्याने संसाराचा गाडा चालवताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. 'राजकारणाने चूल पेटत नाही, तर चूल विझून जाते,' हे वास्तव लक्षात आल्यावर त्यांनी खचून न जाता 'उमेद' अभियानांतर्गत अंबिका महिला बचतगटाची स्थापना केली.
कधीकाळी केवळ एका म्हशीपासून सुरू झालेला हा प्रवास आज १५ लाखांच्या गुंतवणुकीपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या भरभराटीमुळे निराशेत गेलेल्या कुटुंबात आता आनंदाचे वातावरण असून, त्यांची दोन्ही मुले आता उच्च शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील कित्येक महिलांना उभारी देणारी विजयालक्ष्मी यांची ही प्रेरणादायी यशकथा आहे.
संघर्षातून उभी राहिली 'उमेद'
पतीने राजकारणाऐवजी कुटुंबाकडे लक्ष द्यावे, ही विजयालक्ष्मींची इच्छा होती. घरची ओढाताण थांबवण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक शिस्त लावली आणि 'उमेद'च्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
शून्यातून विश्व निर्माण
सुरुवातीला अवघ्या एका म्हशीपासून दुग्ध व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. कष्टाच्या जोरावर चार म्हशी घेतल्या. व्यवसायात नफा दिसू लागताच ४.५ लाखांचे बैंक कर्ज घेऊन त्यांनी आधुनिक यंत्रसामग्री आणि दूध वाहतुकीसाठी चारचाकी वाहनदेखील खरेदी केले.
व्यवसायाचा महाविस्तार
आज फुलवाडीसह परिसरातील १० गावांमधून विजयालक्ष्मी यांच्याकडे दूध संकलनासाठी ग्राहक येतात. दररोज सुमारे २००० लिटर दुधाचे संकलन करून त्याची यशस्वी विक्री केली जाते. या व्यवसायात त्यांनी आतापर्यंत १५ लाखांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
पतीनेही दिला व्यवसायाला हातभार
विजयालक्ष्मी यांची जिद्द आणि व्यवसायातील वाढती प्रगती पाहून, राजकारणात सक्रिय असलेल्या त्यांच्या पतीनेही आता राजकारण बाजूला सारले आहे. ते आता पूर्णवेळ आपल्या पत्नीला या दुग्ध व्यवसायात मदत करत आहेत.
महिलांनी केवळ घरात शांत बसून राहण्यापेक्षा आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा वापर कुटुंबाच्या व गावाच्या विकासासाठी करावा. पैसा असेल तरच मानसन्मान आणि प्रगती शक्य आहे. 'उमेद' गटाने मला आधार दिला, तुम्हीही संधीचे सोनं करा. - विजयालक्ष्मी कुताडे.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
Web Summary : Vijaya Lakshmi from Tuljapur overcame financial struggles by starting a dairy business with one buffalo. Now, she earns ₹1 lakh monthly, inspiring rural women and supporting her children's education after expanding her business with loans and modern equipment.
Web Summary : तुलजापुर की विजया लक्ष्मी ने एक भैंस से डेयरी व्यवसाय शुरू करके वित्तीय कठिनाइयों को दूर किया। अब, वह ₹1 लाख मासिक कमाती है, ग्रामीण महिलाओं को प्रेरित करती है और ऋण और आधुनिक उपकरणों के साथ अपने व्यवसाय का विस्तार करने के बाद अपने बच्चों की शिक्षा का समर्थन करती है।