Join us

दोन वर्षांपूर्वी फिरविला होता रोटोव्हेटर; आत २० गुंठ्यांत झाली ६ लाखांची अद्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:40 PM

विष्णूरावांची आले शेती, पत्नीच्या मदतीने मेहनतीचे केले चीज

नसीम शेख

शेतीत एखाद्या वर्षी अपयश आले तर ते कायम टिकून राहत नाही. त्यासाठी हवी असते केवळ कष्ट करण्याची तयारी व आशावादी जिद्द. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील शेतकरी विष्णू धनाजी पाचे यांना आला आहे. दोन वर्षांपूर्वी भाव नसल्यामुळे एक एकर अद्रकावर रोटोव्हेटर फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

तरीही हताश न होता पाचे यांनी अद्रकची आशा सोडली नाही. आणि यंदा त्यांना सहा लाखांचे उत्पन्न झाले. यंदा त्यांनी २० गुंठे क्षेत्रांत अद्रकची लागवड केली होती. सध्या या अद्रकची काढणी सुरू असून, यातून त्यांना ७० क्विंटलपर्यंत अद्रक मिळणार आहे. सध्या अद्रकला साडेआठ ते नऊ हजार प्रतिक्विंटल भाव असल्यामुळे यातून जवळपास सहा लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

यासाठी पाचे पती-पत्नीने या अद्रकसाठी मेहनत घेतली. यावर्षी अद्रकला चांगला भाव मिळाल्याने आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

अनेक शेतकरी बियाणे म्हणून देतात पसंती

मागील तीन वर्षांपासून मी दरवर्षी अद्रकची लागवड करीत असतो. दोन वर्षांपूर्वी भाव नसल्यामुळे अद्रक काढणीलाही परवडत नव्हते. अशावेळी एक एकर अदकीवर रोटावेटर फिरवण्याची नामुश्की आली होती. मात्र, खचून न जाता अद्रकची लागवड करीतच राहिलो. यावर्षी चांगले उत्पन्न मिळाले. अदक दर्जेदार निघाल्याने अनेक शेतकरी बियाणे म्हणून पसंती देत आहेत. - विष्णू पाचे, शेतकरी, टेंभुर्णी

हेही वाचा - पंढरपूरी म्हैस भारी; दुग्ध व्यवसायातून एका दिवसाला १५ हजार रुपये कमाई

टॅग्स :पीकशेतीशेतकरीमराठवाडापीक व्यवस्थापन