Join us

१०० किमी प्रवास अन् ४०० रू. किलोने कर्टुले विक्री! पुण्यातील उच्चशिक्षित तरूणाचा नाद खुळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:15 IST

जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी येथील योगेश चव्हाण यांनी प्राणीशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे.

Pune : "आपण पिकवेल्या शेतमालाचा दर ठरवणारे व्यापारी कोण? आपण पिकवलं म्हटल्यावर आपणच दर ठरवायचा अन् आपणच विकायचं, लोकं पैसे द्यायला तयार असतात पण शेतकऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे." असं ठणकावून सांगणारे आणि आपल्या शेतात विषमुक्त पद्धतीने पिकवलेला घेवडा, कर्टुले, गहू, लसूण, हरभरा व इतर शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करणारे युवा शेतकरी म्हणजे योगेश चव्हाण...!

जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी येथील योगेश चव्हाण यांनी प्राणीशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. पण मातीशी नाळ जुळलेली असल्यामुळे मागील पाच वर्षांपासून ते जॉब व शेती दोन्ही सांभाळतात. मागच्या दोन वर्षांपासून त्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये रानभाजी समजल्या जाणाऱ्या कर्टुल्याची लागवड केली असून थेट ग्राहकांना विक्री करायला सुरूवात केली.

कर्टुले हे पीक केवळ श्रावण महिन्यात येते. ही हंगामी भाजी विकण्यासाठी त्यांनी गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये प्रयत्न केला पण तिथेही योग्य दर न मिळाल्याने त्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कोथरूड येथील गांधीभवन परिसरात कर्टुले व इतर भाजीपाल्याची ते विक्री करतात.

दरम्यान, पहिल्या तोड्यात जरी कमी माल निघाला तरी ते थेट ग्राहकांनाच विक्री करतात. व्यापारी किंवा दलालाशिवाय शेतमाल विक्री केल्यामुळे जवळपास दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिकचा नफा होत असल्याचा अनुभव योगेश यांचा आहे. आज (९ ऑगस्ट) सकाळीच ते जुन्नर ते पुणे असा १०० किमीचा प्रवास करून ५ ते ७ किलो कर्टुले विक्रीसाठी पुण्यात आले होते. 

कर्टुले ४०० रूपये किलो तर घेवडा २०० रूपये किलोप्रमाणे विक्री केला जात असून यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे. मागील २ वर्षांपासून ते कोथरूड परिसरातील गांधीभवन परिसरात कर्टुल्याची विक्री करत असल्यामुळे त्यांची अनेक ग्राहकांशी ओळख झाली आहे.

"आपण पिकवेलला शेतमाल आपणच विक्री केला पाहिजे. कोणत्याही दलालाशिवाय, लाज न बाळगता शेतमालाची विक्री केली तर नक्कीच चांगला फायदा होतो. कर्टुले व घेवडा यासोबत मी विषमुक्त कांदे, लसूण, गहू, हरभरा अशी पिके घेतो. खात्रीचा माल असल्यामुळे शेतमाल तयार होण्यापूर्वीच ग्राहकांकडून ऑर्डर दिल्या जातात." असं योगेश सांगतात. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे