Join us

कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या या हुकमी पिकाने बोबडे कुटुंबाच्या जीवनात आणला सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 09:33 IST

राजापूर (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी रेश्मा रमेश बोबडे आणि हभप रमेश शिवराम बोबडे या दांपत्याने गुलछडीचे भरघोस उत्पादन घेवून नवा आदर्श निर्माण केला आहे.

सूर्यकांत किंद्रेराजापूर (ता.भोर) येथील प्रयोगशील शेतकरी रेश्मा रमेश बोबडे आणि हभप रमेश शिवराम बोबडे या दांपत्याने गुलछडीचे भरघोस उत्पादन घेवून नवा आदर्श निर्माण केला आहे.

फुलांचा हार, गजरे, माळा, वेण्या, फुलदांड्यांचा फुलदाणी, पुष्पसजावट सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी होत असल्याने निशिगंधाच्या फुलांना बाजारात वर्षभर मागणी असून बाजारभावही चांगला मिळतो. रमेश बोबडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, पाणी, वातावरण, उपलब्ध मजूर यांच्यामध्ये मेळ घालत नगदी उत्पादन देणारी गुलछडी पीक घेतले आहे.

पूर्वमशागत करताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी आडवी खोल नांगरट करून घेतली लागवडीपूर्वी नांगरलेली जमीन किमान एक महिना उन्हात चांगली तापू दिली. तीन ट्रॉली शेणखत टाकले कुळवून, फणपाळी देवून रोटर मारुन जमीन भुसभुशीत करून घेतली.

वीस गुंठ्यामध्ये घरच्या शेतीतच तयार केलेले गुलछडीचे साडेतीन पोती कंदाचा वापर करून ४ फुट सरीतील पाटपाण्याचे शेजारी आठ इंचावर कंदाची लागवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली.

त्यानंतर गुलछडीच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी खतांचा पहिला डोस एक महिना झाल्यावर युरिया, परफॉस्फेट, १०:२६, एम ओ पी यांचे मिश्रण करून दोन पोत्यांचा वापर केला, दुसरा डोस दोन ते अडीच महिन्यांत दिला. तिसरा डोस साडेतीन महिन्यांत कंदाच्या कडेला खड्डा घेऊन खतांचा डोस दिला, वातावरणात होणाऱ्या बदलानुसार कीटकनाशकाची फवारणी केली जाते.

विशेषतः थंडीच्या काळात फुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. पाटपाणी, स्पिंकल वापर करून आठ दिवसांनी पाणी दिले. आवश्यकतेनुसार तापमानातील बदलानुसार पाणी द्यावे लागते. लागवडीनंतर जुलै महिन्यात फुलांची तोडणी सुरू झाली.

या फुलात तोडायची फुले प्रति किलो ५० रुपये ते १५० रुपये, काडी बंडल ५० रुपये ते २०० रुपये प्रमाणे विक्री होत आहे आज अखेर दिड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून एक लाखाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. फुलांचा हंगाम जुलै महिन्यात सुरू होऊन मे महिन्यापर्यंत चालतो. आवश्यकतेनुसार मजुरांचा वापर केला जातो.

सकाळी सहा ते साडेसात या वेळेत फुलांची तोडणी केली जाते. त्यानंतर गुलटेकडी फुलबाजार पुणे येथे फुलांची विक्री केली जाते. पाणी, खत, तण नियंत्रण यांचे सुयोग्य नियोजन करून जास्त उत्पादन घेता येते.

वर्षभर गुलछडीला चांगला दर मिळत असल्याने कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे हुकमी असे गुलछडीचे पीक आहे पुण्याच्या मार्केट जवळच असल्याने हक्काची बाजारपेठ उपलब्ध असल्याने रोजच्या रोज चांगल्या भावाने विक्री होते. राजापूर गावात घरटी गुलछडीचे उत्पादन घेतले जाते.

अधिक वाचा: भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

टॅग्स :शेतकरीफुलशेतीफुलंशेतीपीकपुणेबाजारभोर