नम्रता भोसलेखटाव : शेती म्हणलं की बैलाच्या साहाय्याने शेती करणारा पारंपरिक शेतकरी नजरेसमोर येतो; परंतु काळानुरूप शेती तंत्रज्ञानात बदल होत असतानाच यांत्रिकीकरणाचे साहाय्याने शेती करताना शेतकरी दिसून येत आहे.
सर्वांना ट्रॅक्टरसारखी साधनं घेणं शक्य नसतं. अशांसाठीच दुष्काळी खटावच्या मातीत 'अवजारांची बँक' संकल्पना रुजली आहे.
महिला बचत गटांनी ट्रॅक्टरसह पेरणी यंत्र, ऊस भरण यंत्र, नांगर, कोळपणी यंत्र, रोटावेटर, आदी शेती उपयुक्त अवजारे खरेदी केली आहेत.
बचतगटाच्या महिलांना सवलतीत तर इतर शेतकऱ्यांना ती भाड्याने दिली जाणार आहेत. शेती क्षेत्रातही यांत्रिकीकरण आले आहे. त्याचा स्वीकार करत असतानाच खटावमधील अनेक महिलांनी सक्षमीकरणात पुढचे पाऊल टाकले आहे.
अनेक महिला शेतकरी आता ट्रॅक्टर चालवून नांगरणी करणे तसेच इतर शेतीची कामे स्वतः करतात; जी पूर्वी केवळ पुरुषांची कामे मानली जात होती.
शेतकऱ्यांबरोबरच घरातील महिलाही यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने शेतात काम करताना दिसून येऊ लागल्या आहेत. महिला शेतामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. ट्रॅक्टरसारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून आपले काम अधिक प्रभावीपणे करत आहेत.
सद्यःस्थितीत शेती व्यवसायात दररोज एक नवे आव्हान व संकट येत आहे. त्याला डगमगून न जाता आपल्या कुटुंबासमवेत पतीच्या बरोबर उभे राहून महिला शेती चांगल्या पद्धतीने करू शकतात, हे दाखवून देण्याचे काम आजही महिला शेतकरी करत आहेत.
शेती व्यवसायाकडे तरुण दुर्लक्ष करत आहेत. नोकरीच्या मागे लागत आहेत. अशा परिस्थितीत महिला स्वतः ट्रॅक्टर वापरून घरच्या शेतीची नांगरणी, वखरणी व इतर कामे करत असल्याने महिलांच्या धाडसाचे आणि कर्तबगारीचे कौतुक केले जात आहे.
महिलाही चालवितात ट्रॅक्टरसह अन्य यंत्रे◼️ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत महिला बचत गटातील सदस्यांना सक्षम करत आहे.◼️ अवजारे बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टरसह पेरणी यंत्र, ऊस भरण यंत्र, नांगर, कोळपणी, रोटावेटर, आदी शेतीस उपयुक्त असणाऱ्या साहित्याचे वाटप करून बचत गटातील महिला शेतकऱ्यांना शेती या व्यवसायाकडे वळवण्याचे काम करत आहे.◼️ यामुळे महिला आत्मनिर्भर तर होत आहेतच; त्याचबरोबर शेतातील यांत्रिकीकरणाचा बदल स्वीकारून धाडसाने पुरुषांच्या बरोबरीने शेतात यंत्राच्या साहाय्याने शेती करण्यासही पुढे सरसावत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर