गजानन पाटीलदरीबडची : शेतीत रासायनिक खतांच्या वापराचा अतिरेक झाला असताना खलाटी (ता.जत) येथील तरुण शेतकरी सज्जन लक्ष्मण शिंदे यांनी खडकाळ माळरानावर दहा वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे.
उसाचे एकरी पंचवीस ते तीस टन उत्पादन घेतात. पावणेतीन टन सेंद्रिय गूळनिर्मिती केली. विक्रीतून तीन लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा नफा झाला.
कुटुंबाचे स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी त्यांनी विषमुक्त शेती साकारली आहे. नव्या पिढीतील तरुण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी आदर्श घालून दिला आहे.
खलाटी येथील सज्जन शिंदे यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. आजोबांनी सेंद्रिय शेती करत कुटुंबाचे आरोग्य जपले. साडेपाच एकर जमीन माळरान आणि खडकाळ आहे. गोआधारित सेंद्रिय शेती करत आहे.
सुरुवातीला साडेपाच एकर सेंद्रिय शेती केली. पाच ते सहा वर्षे पूर्णपणे शेती तोट्यात गेली. त्यानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविला. चार वर्षांपूर्वी ऊस लागण केली.
जैविक उसापासून गूळनिर्मिती सुरू केली. दोन वर्षे थेट शेतकरी ते ग्राहक तत्त्वावर विक्री चालू केली. गेल्या वर्षी जुन्या पद्धतीने गुऱ्हाळ बनवले. मनुष्यबळ मिळत नसल्याने मिनी गुऱ्हाळ तयार केले. चार मंजूर व घरच्यांच्या सोबत गूळ उत्पादन करत आहे.
गुळामध्ये प्लेन ढेप, मसाला ढेप, एक किलोचा प्लेन ढेप, मसाला खडा, प्लेन पावडर, प्लेन गूळ पावडर, मसाला गूळ पावडर असे प्रॉडक्ट बनवून ऑर्डरप्रमाणे समाज माध्यमातून शेतमालाची विक्री घरपोच पद्धतीने करीत आहेत.
प्रतिकिलो ११० ते १२० रुपयांपर्यंत दर मिळाला. पुणे, अमरावती, नागपूर, धुळे, जळगाव, मुंबई, कोल्हापूर, सांगली येथून मागणी येते.
पार्सल ट्रॅव्हल्स, एसटी बसने पाठवितो. कडधान्य, भाजीपाला, फळे, खिल्लार देशी गाईचे तूप तयार करून मागणीनुसार थेट ग्राहकाला विक्री होते.
सेंद्रिय शेती प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपडकृषी विभागाने 'एक आदर्श शेतकरी' व 'सेंद्रिय युवा शेतकरी' असा पुरस्कार देऊन येथे सज्जन शिंदे यांचा गौरव केला आहे. इतर राज्यांसह परदेशात पाठविण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा विभागाकडून सेंद्रिय शेतीचे अधिकृत प्रमाणपत्रासाठी या शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. चार गायी, चार पाडी, दोन बैल, तीन म्हैस, शेळ्या व देशी कोंबड्या अशी देशी जनावरे जतन केली आहेत.
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास फायदेशीर आहे. शेती उत्पादनावर प्रक्रिया करून थेट ग्राहकाला विक्री केल्यास दुप्पट नफा मिळतो. - सज्जन शिंदे, खलाटी, प्रगतिशील शेतकरी
अधिक वाचा: नोकरी अन् व्यवसायापेक्षाही अधिक नफा कमवून देतेय फौजींची शेती; १ एकर कलिंगडातून ३ लाखांची कमाई