Join us

कहाणी उसाच्या गुऱ्हाळांची; साखरेच्या पट्ट्याला सेंद्रिय गुळाची गोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 4:28 PM

महाराष्ट्र म्हटलं की, ऊस उत्पादन हे समीकरणच निर्माण झाले आहे. आणि ऊस उत्पादन म्हटलं की पूर्वी गुऱ्हाळगृह असणारच. गूळ उत्पादकांनी तयार केलेल्या गुळाला कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली अशी चांगली बाजारपेठ निर्माण झाली. ती सध्या आंतरराष्ट्रीय गूळ मार्केट म्हणून नावारूपाला आली आहे.

कऱ्डहासह पाटण तालका साखरपट्टा म्हणून ओळखला जातो; मात्र गत काही वर्षात मूळ उत्पादनात काती घडत आहे. त्यामुळे साखरेच्या पट्ट्यालाही सेंद्रिय गुळाची गोडी लागल्याचे दिसून येत असून सुमारे १० टक्के गूळ उत्पादक सेंद्रिय गुळाची निर्मिती करीत आहेत, त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय गूळाच्या उत्पादनामध्ये कऱ्हाड आणि पाटण हे दोन्ही तालुके आघाडीवर असतील, अशी चिहे आहेत.

महाराष्ट्र म्हटलं की, ऊस उत्पादन हे समीकरणच निर्माण झाले आहे. आणि ऊस उत्पादन म्हटलं की पूर्वी गुऱ्हाळगृह असणारच. गूळ उत्पादकांनी तयार केलेल्या गुळाला कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली अशी चांगली बाजारपेठ निर्माण झाली. ती सध्या आंतरराष्ट्रीय गूळ मार्केट म्हणून नावारूपाला आली आहे. गूळ उत्पादनाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात कालांतराने सहकाराचे जाळे निर्माण होऊन सहकारी साखर कारखाने उभे राहिले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला सहकार चळवळ वाढीचा सधन पट्टा म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली.

साखर कारखान्यांचे जाळे निर्माण झाले असले, तरी गूळ उत्पादनाचे अस्तित्व मात्र नेहमीच टिकून राहिले आहे. पूर्वी गूळ उत्पादन म्हटलं की, गुऱ्हाळ आणि इंजिनाचा आवाज आजही आपल्या डोक्यात घर करून आहे. गुऱ्हाळगृह सुरू करताना उत्पादकास पन्नास ते साठ रोजगारांचा ताफा प्रथम जुळवावा लागत असे. त्यानंतर गूळ उत्पादनासाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करूनच गुळाची निर्मिती करावी लागत असे. त्यामुळे पूर्वीच्या उत्पादकांनी अनेक वर्षे नैसर्गिक साधनसंपत्तीचा म्हणजेच भेंडी, गायीचे तूप अशा साधनांचा वापर करून गुळाची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

अशा नैसर्गिक साधनांचा वापर केल्याने पूर्वी गुळाला रंग थोडा काळपट असला तरी त्याची गोडी व टिकाऊपणा चांगला होता. तो गूळ खाल्ल्यामुळे मानवी शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नव्हता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील गुळाला स्थानिक ग्राहकांबरोबरच राज्य, परराज्यांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढली. म्हणूनच कऱ्हाड, कोल्हापूर हे आंतरराष्ट्रीय गूळ मार्केट नावारूपास आले आहे. जसजशी साखर कारखान्यांची निर्मिती झाली, तसतशी ऊस उत्पादकांची मानसिकताही बदलत गेली. दिवसेंदिवस ऊस उत्पादनाच्या पद्धतीत बदल होत गेला.

पारंपरिक शेतीऐवजी उत्पादनवाढीच्या दृष्टीने शेतकरी प्रयत्न करू लागले. त्यामुळे पूर्वीच्या नैसर्गिक शेतीवर रासायनिक पद्धतीचे अतिक्रमण वाढले. एकोणिसाव्या शतकात तर उसाचे टनेज वाढविण्यासाठी जवळजवळ ९० टक्के शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक द्रव्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. झटपट पीक घेऊन उत्पादन वाढविण्याकडे कल वाढला. त्या पद्धतीचा वापर केल्याने अपेक्षेप्रमाणे वाढही झाली. वजन चांगले वाढून कारखान्यांना दरही चांगला मिळू लागला; मात्र रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढल्याने नैसर्गिक उत्पादन नामशेष होऊ मात्र त्या गुळाची गोडी दिवसेंदिवस कमी होत होती.

अधिक वाचा: आरोग्यासाठी लाभदायी सेंद्रिय गूळ, पळवी आजाराला दूर

पांढराशुभ्र दिसणारा गूळ केमिकलच्या वापरामुळे गोडीला खारटपणाची जोड मिळाली. तर पूर्वीचा नैसर्गिक गूळ दोन-दोन वर्षे टिकत असे. हा पांढरा गूळ मात्र एक वर्षही टिकत नाही, हे समोर आले. त्याचा परिणाम असा झाला की, उत्पादन वाढल्याने मध्यंतरीच्या काळात गुळाचे दरही गडगडले. साखर कारखान्यांच्या दराची बरोबरी गूळ उत्पादक करू शकत नसल्याने अनेक गुऱ्हाळगृहे बंद पडली. दिवसेंदिवस रासायनिक पद्धतीच्या शेती उत्पादनाचे दुष्परिणाम टोकाला पोहोचले.

शेतीचा कस कमी होण्याबरोबरच अशी उत्पादने दररोजच्या जीवनात वापर होऊन मानवी शरीरावर हानिकारक घटक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अनेकांनी गुन्हाळगृहात रासायनिक गूळनिर्मिती बंद करून सेंद्रिय गूळ उत्पादनाला प्राधान्य दिले. सेंद्रिय गूळ उत्पादनात बदल झाला असल्यामुळे गुळाची गोडी वाढली आहे. सेंद्रिय गुळाची निर्मिती करीत असताना उसाची लागवडही सेंद्रिय पद्धतीने केली जाते. त्यानंतर गूळनिर्मिती करताना त्यात कोणतेही रासायनिक केमिकल्स वापरले जात नाहीत. हा गूळ दिसायला तांबूस रंगाचा आणि मऊ असतो.

आरोग्यासाठी अशा रसायनविरहित गुळाचे फायदे अनेक असतात. केमिकल्स असलेला गूळ आरोग्यासाठी अपायकारक असतो. केमिकलयुक्त गूळ तयार करीत असताना विविध रसायने वापरली जातात. यामध्ये गंधक, सोडियम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शिअम ऑक्साइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बाय कार्बोनेट यांचा वापर केला जातो. केमिकल्सचा वापर प्रामुख्याने गुळाची चव, रंग आणि गूळ अधिक काळ टिकविण्यासाठी केला जातो. गुळाला अधिक पिवळा रंग येण्यासाठी गंधक पावडर मिसळली जाते. यामुळे गुळाच्या पिवळ्या रंगावर न भाळता काळसर तांबूस असलेला सेंद्रिय गूळ खाण्यासाठी वापरला पाहिजे.

- जगन्नाथ कुंभारमसूर, कराड

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतीशेतकरीपीकसाताराकराडपाटणसेंद्रिय शेती