Join us

अवघ्या ३६ गुंठ्यात शेतकऱ्याने मिळविले ११५ क्विंटल अद्रकीचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 12:02 IST

प्रगतिशील शेतकरी उखाजी बोराडे यांनी आपल्या ३६ गुंठे शेतामध्ये घेतले लाखो रुपयांचे अद्रकीचे पीक

फकिरा देशमुख

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोदा येथी प्रगतिशील शेतकरी उखाजी बोराडे यांनी आपल्या ३६ गुंठे शेतामध्ये लाखो रुपयांचे अद्रकीचे पीक घेतले आहे. अद्रकीला यावर्षीच्या हंगामामध्ये १२ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. बोराडे यांनी ३६ गुंठ्यांमध्ये आजवर ११० क्विंटल उत्पन्न घेतले आहे. त्यांना एकूण २२५ क्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे.

एरवी आद्रक या पिकाला हजार रुपयांपासून, तर दोन तीन हजार रुपयापर्यंत प्रतिक्विंटल भाव असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला खर्चसुद्धा यापुढे निघत नाही; परंतु यावर्षी अचानकपणे अद्रक या पिकासाठी यावर्षी चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे काही दिवसापासून या पिकाला सात ते आठ हजार रुपये भाव होता; परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये १३ हजार रुपयेपर्यंत मार्केटमध्ये अद्रक पिकाला भाव मिळाला आहे.

बोराडे यांना तब्बल २५ लाख रुपयाचे उत्पन्न निघाले आहे. अनेक वर्षांपासून ते अद्रक व विविध पिके घेत असताना आतापर्यंत त्यांना कुठल्याच प्रकारच्या पिकांमधून एवढा मोठा नफा मिळाला नाही; परंतु यावर्षी नशिबाने साथ दिल्यामुळे व चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे त्यांच्या मेहनतीची चीज झाले आहे.

या संदर्भात उखाजी बोराडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी दरवर्षी अद्रकीचे पीक घेतो. काही वेळेला या पिकामुळे औषधी, खत व मजुरीचासुद्धा खर्च निघाला नाही; परंतु यावर्षी बाजारामध्ये चांगला भाव मिळाल्यामुळे दोन-तीन वर्षांपासून झालेले नुकसान भरून निघाले आहे. दरम्यान, बोराडे यांची शेती पाहण्यासाठी या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत.

अद्रक उत्पादनातून शेतकऱ्यांनी कमावले ४५ कोटी; तांबेवाडी गावाचा राज्यासमोर आदर्श

पाण्यासह इतर बाबींचे नियोजन केल्याने वाढले उत्पन्न

उखाजी बोराडे यांनी २० मे २०२३ रोजी अदकीचे दहा क्विंटल बियाण्याची लागवड ३६ गुंठे शेतात केली. लागवडीनंतर ड्रीपने पाणी देण्याची व्यवस्था केली. यामध्ये सोळा एमएमचा ड्रीप वापरला असून, ताशी चार लिटर पाणी एका झाडाला मिळते.

या जमिनीचा प्रकार हा मध्यम व काळी जमीन असल्यामुळे या पिकासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरली आहे. त्यांनी एका महिन्यामध्ये फवारणीचे चार डोस तसेच ड्रीप निपाणी किंवा खत याचेसुद्धा चार डोस दिले आहेत.

१६ गुंठेमध्ये ११५ क्विंटल अद्रक

आजवर १६ गुंठेमध्ये ११५ क्विंटल अद्रक निघाली आहे. आणखी वीस गुंठ्यांमधील अद्रक काढणीचे काम सुरू आहे. यात १२० ते १३० क्विंटल अद्रक निघू शकते. एका क्विंटलचे १२ हजार रुपये बाजारभाव मिळाला आहे. शेवटपर्यंत भाव कायम राहिल्यास ३६ गुंठे शेतात जवळपास २२५ क्विंटल २७ लाख रुपयांची अद्रक निघणार असल्याचा अंदाज आहे. - उखाजी बोराडे, शेतकरी.

टॅग्स :पीकशेतीशेतकरीमराठवाडा