Join us

पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीने वागदरे बंधूंच्या शेतीला आली रंगत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 3:48 PM

वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र, त्यात दोघे भाऊ, पारंपरिक शेती व गाय-गोठा करून मेटाकुटीला आलेल्या खंडू देवराम वागदरे यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत दहा गुंठे जमीन क्षेत्रामध्ये पॉलीहाऊस करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

शरीफ मोमीनपारंपरिक शेतीत मिळणाऱ्या पा तटपुंज्या कमाईने मेटाकुटीस आलेल्या दोन भावांनी पॉलीहाऊस उभारण्याचा निर्णय घेतला. या पॉलीहाऊसमध्ये कॅप्सिकम रंगीत ढोबळी मिरचीची रोपे लावली, अवघ्या काही महिन्यांतच लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने त्यांच्या जीवनात समृद्धी आली.

वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र, त्यात दोघे भाऊ, पारंपरिक शेती व गाय-गोठा करून मेटाकुटीला आलेल्या खंडू देवराम वागदरे यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत दहा गुंठे जमीन क्षेत्रामध्ये पॉलीहाऊस करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी शेतजमीन तारण ठेवून किचे कर्ज घेतले. 

दहा गुंठे पॉलीहाऊससाठी १४ लक्ष रुपये खर्च झाला. मावळ प्रांतातून लाल माती आणली. पॉलीहाऊसमध्ये लागवड करण्यासाठी उच्च प्रतीचे कॅप्सिकम, रंगीत ढोबळी मिरचीची ३ हजार रोपे आणली, कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याने रोपांची लागवड करण्यात आली.

योग्य मात्रेमध्ये खते, तसेच पिकाची फवारणी ठिबक सिंचनाद्वारे लिक्वीड खते यामुळे तीन महिन्यांमध्ये उत्तम प्रतीची लाल, पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीचे पीक तोडणीसाठी आले. पहिल्याच तोड्याला ३०० किलो ढोबळी मिरचीचे पीक विक्रीसाठी पाठविण्यात आले.

पिकाची योग्य देखभाल व खत, औषध व पाण्याचे योग्य नियोजन यामुळे ढोबळी मिरची पिकाचे आठवड्यात दोन तोडे होऊ लागले. मालाची क्वालिटी व साइज पाहून पुणे, नारायणगाव, मंचर परिसरातील मॉलधारकांची लाल, पिवळी ढोबळी मिरचीला मागणी वाढली.

पिकाचे अधिकचे पैसे हाती आल्याने खंडू वागदरे यांना कष्ट करण्याचा हुरूप वाढला. पहिल्या तिमाहीतच खंडू वागदरे यांना तीन लाख रुपये पीक उत्पादन प्राप्त झाले. वागदरे यांचे पिकाचे नियोजन पाहून परिसरातील शेतकरी त्यांच्या पॉली हाऊसला भेटी देऊ लागले.

पहिल्याच पिकात खंडू वागदरे यांना सहा महिन्यांमध्ये पिकाचे रोपे व लागवडीचा सर्व खर्च वजा जाता ५ लक्ष रुपये नफा प्राप्त झाला आहे. पत्नी व खंड्डू वागदरे यांनी स्वता मेहनत व पिकाचे योग्य नियोजन केल्याने ते अल्पावधीत लखपती झाले आहेत.

अधिक वाचा: शिक्षक पदाला रामराम केला, पेरूमधून मालामाल झाला

टॅग्स :शेतकरीशेतीमिरचीभाज्यामावळनारायणगाव