Join us

कॅटरिंग व्यवसाय सोडून २३ एकर क्षेत्रावर फळबाग फुलवणारा तेंडूलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 3:25 PM

आंबा, काजू, नारळ, सुपारी कोकम, रामफळ, फणस लागवड करून डोर्ले येथील अजय तेंडुलकर यांनी बागायती फुलविली आहे. बागायतीमध्ये भाजीपाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ लागवड करून आंतरपिकेही घेत आहेत.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : आंबा, काजू, नारळ, सुपारी कोकम, रामफळ, फणस लागवड करून डोर्ले येथील अजय तेंडुलकर यांनी बागायती फुलविली आहे. बागायतीमध्ये भाजीपाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ लागवड करून आंतरपिकेही घेत आहेत.

सौर पंप योजनेचा लाभ घेत त्यांनी पिकांना सूक्ष्म सिंचनाद्वारे बारमाही पाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे २३ एकर क्षेत्रातील त्यांची फळबाग लागवड चांगलीच बहरली आहे. मुंबई येथे असलेला कॅटरिंग व्यवसाय सोडून डोर्ले येथील अजय रवींद्रनाथ तेंडुलकर गावात स्थायिक झाले.

गावातील पडीक जमिनीची त्यांनी साफसफाई करून त्यामध्ये फळबाग लागवड केली. उत्पादन सुरू झाले असून, स्वतः विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून इस्रायल पद्धतीने आंबा लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्यांनी आंबा लागवड केली आहे.

शिवाय आंबा पुनरुज्जीवन योजनेचा लाभ व तांत्रिक ज्ञान घेत स्वतः अवलंब करीत आहेत. खरीप हंगामात भात लागवड करीत असून, त्यासाठी चारसूत्री पद्धतीचा अवलंब करत आहेत. आंबा, काजू फळांची प्रतवारी करून विक्री करतात. सुरुवातीचा आंबा मुंबई मार्केटमध्ये विक्रीला पाठवितात.

मार्केटमध्ये आवक वाढली की, दर गडगडतात. त्यावेळी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील खासगी ग्राहकांशी थेट संपर्क साधून विक्री करतात. त्यामुळे दरही चांगला मिळतो. शेतीशाळा, विद्यापीठ प्रशिक्षणामध्ये सहभागी होत माहिती घेत, स्वतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याने शासनाने उद्यान पंडित पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

सेंद्रिय खतांचा वापरशेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, गोपालन सुरू केले आहे. गांडूळ खत, सेंद्रिय खत, जीवामृत, निंबोळी अर्क, विष्टेपासून बायोडायनामिक कंपोस्ट इत्यादी सेंद्रिय खतांची निर्मिती स्वतः करून त्याचा बागायतीसाठी वापर करीत आहेत.

रासायनिक खतांचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे आंबा, काजू, नारळ तसेच अन्य फळांचा दर्जा राखण्यात यश आले आहे. दर्जेदार फळांना बाजारात दरही चांगला मिळतो. फळांची वर्गवारी करून पॅकिंगवर स्वतः लक्ष देतात.

सौरपंपाच्या वापरावर फुलली बागायती- बागायतीसाठी पाण्याची आवश्यकता गरजेची आहे. विजेवरील पंपापेक्षा त्यांनी सौर कृषिपंप बागेत बसविले आहेत. दहा ठिकाणी सौरपंप बसविले असून, त्यामुळे बागायतीला भरपूर पाणी मिळते. नैसर्गिक स्रोताचा वापर करत असल्याने विजेच्या बिलाची मात्र बचत झाली आहे. ठिबक सिंचन सुविधा असल्याने पाण्याचा योग्य वापर करत असल्याने कातळावरील बाग चांगली बहरली आहे.

- डोर्लेतील त्यांनी २३ एकर क्षेत्रात २२०० आंबा, ८०० काजू, ८०० नारळ, ४०० सुपारी लागवड केली आहे. नारळ बागेत त्यांनी मसाला पिकांची लागवड केली आहे. शिवाय ४०० केळीचीही लागवड केली आहे. शिवाय फणस, कोकम, रामफळाची लागवडही केली आहे. उत्पादन सुरू झाले असून, त्यांच्याकडे नियमित दररोज पाच ते सहा माणसांना रोजगार प्राप्त झाला आहे.

शेतीची आवड असल्याने मुंबईतील कॅटरिंग व्यवसाय सोडून गावाकडे स्थायिक झालो. पडीक जमिनीत योग्य नियोजन करून विविध फळझाडांची लागवड केली. मात्र, कृषी विभाग व कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन घेत लागवडीचे तंत्रज्ञान अवगत केले. अन्य शेतकऱ्यांनाही त्याबाबत माहिती देत आहे. बागायतीसाठी सर्वाधिक सेंद्रिय खताचा वापर करत आहे. सोलर पंप बसविले असून, त्यामुळे मुबलक पाणीपुरवठा होत आहे. बागायतीत विविध आंतरपिके घेत असल्यामुळे खर्च विभागला जात आहे. - अजय तेंडुलकर, डोर्ले

टॅग्स :शेतकरीशेतीआंबाफलोत्पादनरत्नागिरीविद्यापीठकोकणसेंद्रिय शेती