गोविंद कदम
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील ढेगे पिंपळगाव येथील उच्चशिक्षित शेतकरी ओम ढगे यांनी तालुक्यात पहिल्यांदाच नवीन प्रयोग केला आहे. शुगर फ्री, विटामिन सी असलेल्या शरीरासाठी उपयुक्त पिवळ्या टरबुजाची लागवड केली आहे.
ज्यात चाळीस गुंठ्यांमध्ये त्यांना २५ टन उत्पादन मिळाले आहे. तर या टरबुजाची मागणी असल्यामुळे दिल्लीतील एका व्यापाऱ्यांनी शेतातूनच १२ रुपये किलोप्रमाणे पिवळे टरबूज खरेदी केले. यातून ढगे यांना दोन लाख चाळीस हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
तालुक्यातील ढगे पिंपळगाव या गाव खेड्यातील तरुण शेतकरी ओम ढगे यांनी पारंपरिक शेती न करता एक वेगळ्या पिकातून लाखो उत्पन्न होऊ शकते असाच संदेश या पिवळ्या टरबूज शेती प्रयोगातून दाखवून दिला आहे.
यापूर्वी ढगे यांनी काकडी, सिमला मिरची, मिरची, वांगे, टमाटे, भरताचे वांगे, टरबूज, खरबूज, आंबे व नारळ अशा विविध पिकांचा प्रयोग त्यांनी केलेला आहे.
आपल्या शेतात सतत वेगवेगळे प्रयोग करत लाखोंची उलाढाल करणारे ढगे आता प्रयोगशील शेतकरी अशी परिसरात ओळख मिरवत असून त्यांच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे.
आई-वडील, भाऊ तसेच तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपल्लेवार यांचे नेहमीच मार्गदर्शन लागते. त्यामुळे मी वेगवेगळे प्रयोग करण्यात यशस्वी होतो असे शेतकरी ओम ढगे सांगतात.
बहुमुखी आणि पौष्टिक पर्याय
उन्हाळ्याच्या आहारात पिवळ्या टरबुजाचा समावेश केल्याने तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यापासून ते आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करण्यापर्यंत आणि हृदयाच्या आरोग्यास आधार देण्यापर्यंत अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.
त्याची ताजी चव आणि तेजस्वी रंग कोणत्याही जेवणात किंवा नाश्त्यात ते एक स्वादिष्ट भर घालतो. फळांच्या सॅलडमध्ये किंवा ताजेतवाने रस म्हणून, पिवळा टरबूज हा एक बहुमुखी आणि पौष्टिक पर्याय आहे.
हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी