Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबाच्या फुलापासून गुलाबजल व अगरबत्ती निर्मितीचा यशस्वी प्रयोग; करार करून विक्रीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:07 IST

काही व्यक्ती या शेतीत नवनवीन प्रयोग करतात आणि त्याची चर्चा सुरू होते. अशाचप्रकारे करंजे (ता. जावली) येथील नामदेव भिकू धनावडे यांनी तयार केलेल्या गुलाब पाण्याच्या नव्या प्रयोगाची चर्चा होत आहे.

प्रियंका चव्हाणपेट्री: काही व्यक्ती या शेतीत नवनवीन प्रयोग करतात आणि त्याची चर्चा सुरू होते. अशाचप्रकारे करंजे (ता. जावली) येथील नामदेव भिकू धनावडे यांनी तयार केलेल्या गुलाब पाण्याच्या नव्या प्रयोगाची चर्चा होत आहे.

यातून त्यांनी चांगले उत्पन्नही मिळवले आहे. तसेच त्यांनी अगरबत्ती निर्मितीही करून उत्पन्न वाढवले आहे. गुलाब पुष्पापासून गुलाबजल तयार करण्याची कल्पना नामदेव धनावडे यांना सुचली.

पारंपरिक शेती त्यात बदल करून उच्च तंत्रज्ञानयुक्त शेती करून उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग उभारण्याचे ठरविले.

मागील १५ वर्षांपासून शेतीत नियोजन आणि अभ्यास करत दोन एकर शेतामध्ये देशी गुलाब (पाकळी गुलाब) लागवड केली. तसेच ते यूनिटद्वारे गुलाबजल निर्मिती करत आहेत.

डोंगरी भागातही गुलाब शेतीत चांगले यश मिळाले आहे. त्याचबरोबर बाजारात गुलाबाचे दर वाढलेले असतात. त्यावेळी ते गुलाब बाजारात विक्रीस पाठवून चांगले उत्पन्न मिळवितात.

गुलाब शेती करताना पुणे येथील एका व्यापाऱ्यांशी करार केला. गुलाब जलनिर्मिती उद्योग उभारताना त्यातून वाया जाणाऱ्या, शिजवलेल्या गुलाब पाकळ्या सुकवून त्याची पावडर तयार केली.

तसेच स्वतः छोट्या प्रमाणात अगरबत्ती निर्मितीस सुरुवात केली. यामुळे कोणत्याही प्रकारचा माल वाया जात नाही. शेतात सेंद्रीय पद्धतीचा अवलंब केला आहे.

शेतात एकात्मिक कीड व्यवस्थापन, चिकट अन् कामगंध सापळ्याचा वापर, कंपोस्ट अन् जिवामृत गांडूळ खत वापर केला आहे.

गुलाबजल शेतीतून भरघोस उत्पन्न मिळते. यातून कुटुंबाचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. भविष्यात पुणे येथील कंपनीबरोबर माल खरेदीचा करार करून मशरूम उत्पादनाचा शेतीपूरक व्यवसाय सुरू करणार आहे. सर्व व्यवसायांचा माझ्या भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे. तसेच याचा नक्कीच फायदा त्यांना करून देणार आहे. - नामदेव धनावडे, करंजे

अधिक वाचा: बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार आता एकापेक्षा अधिक 'वारस'दार; याचा कसा होणार फायदा?

टॅग्स :फुलशेतीफुलंशेतीशेतकरीकाढणी पश्चात तंत्रज्ञानपीकव्यवसायपुणे