Join us

‘ती’च्या कष्ट आणि ध्येयापुढे यशही झालं नतमस्तक; सोनाली ताईंच्या ब्रँडने आज परराज्यालाही घातली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:15 IST

Success Story : समाजात महिलावर्ग प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही महिलांनी मोठ्या धैर्याने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने उत्तुंग भरारी घेतली आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनाली देसाई-मसूरकर यांची.

समाजात महिलावर्ग प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही महिलांनी मोठ्या धैर्याने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने उत्तुंग भरारी घेतली आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनाली देसाई-मसूरकर यांची.

वडिलांना आधार द्यायच्या उद्देशाने व्यवसायात पाऊल ठेवणाऱ्या सोनाली यांनी काही वर्षांत स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आणि स्वतःचा ब्रँड उभारला. त्यांच्या यशामागे वडील प्रभाकर देसाई यांचे मार्गदर्शन, त्यांच्याकडून मिळालेली शिकवण आणि कष्टाची प्रेरणा आहे.

प्रभाकर देसाई यांनी सुरुवातीला एमआयडीसीमध्ये व्यवसाय सुरू केला. निवृत्तीनंतर मुलाकडे तो व्यवसाय सोपवून स्वतः नव्याने काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. याच काळात माडखोल (ता. सावंतवाडी) येथे त्यांनी डेअरी व्यवसाय उभारला.  या व्यवसायातूनच सोनाली यांना या व्यवसायाचे बाळकडू मिळाले.

सोनाली यांच्या या उद्योगामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा मोठा आधार मिळाला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अन्न प्रक्रिया क्षेत्राला बळकटी देऊन लाभार्थ्यांला स्वत:च्या पायावर उभे करणे हा आहे. या येाजनेमुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठा आधार मिळत आहे.  त्यांनी या योजनेचा लाभ घेत आपला व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहचवला आहे.

सोनाली यांना सुरुवातीला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. पण त्या हार मानणाऱ्यांपैकी नव्हत्या. अडचणींवर मात करत त्यांनी सावंतवाडीत एक छोटे दूध विक्री केंद्र सुरू केले. मात्र त्यांनी फक्त दूध विक्रीत न थांबता, त्यासोबत विविध दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही सुरू केली.

सुरुवातीला छोटा व्यवसाय होता, परंतु दृष्टी मोठी होती. वडिलांच्या साथीने आणि स्वतःच्या कष्टाच्या जोरावर सोनाली यांनी हा व्यवसाय हळूहळू वाढवला. मागे हटायचे नाही, अडचणींना घाबरायचे नाही या ठाम निर्धाराने त्या पुढे चालत राहिल्या. आज त्या स्वतः उभ्या आहेतच, पण त्यांच्या व्यवसायातून इतरांनाही रोजगार देऊन स्वावलंबी बनवले आहे.

सोनाली यांचा प्रवास हा फक्त व्यवसायाची कहाणी नाही; तो धैर्य, आत्मविश्वास आणि कष्टाचा संगम आहे. वडिलांच्या मार्गदर्शनातून सुरुवात करून स्वतःच्या मेहनतीने स्वप्नांना आकार देत, अनेकांसाठी प्रेरणा ठरणारी अशी ही यशोगाथा आहे.

महाराष्ट्राबाहेरही विस्तार

उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आधी नोकरीत मार्केटिंगची जबाबदारी सांभाळली. तेथे मिळालेला अनुभव त्यांच्या पुढील प्रवासाला दिशा देणारा ठरला. बी.फार्म नंतर एमबीएची पदवी, व्यावसायिक दृष्टीकोन आणि कामाचा अनुभव या सगळ्यामुळे सोनालींनी ठरवलं की, “आता स्वतःच्या गावातून काहीतरी मोठं करायचं.”

वडिलांनी लहानशा स्वरूपात सुरू केलेल्या दूध व्यवसायाला पुढे नेण्याचा ध्यास त्यांनी घेतला. पण या वाटचालीत संकटे कमी नव्हती. फॅक्टरी उभारणे, यंत्रसामग्री बसवणे, वित्तपुरवठा मिळवणे या प्रत्येक टप्प्यावर अडथळे आले. समाजाने प्रश्नही विचारले “हे काम महिलांनी कसं करणार?” आर्थिक चढ-उतारांचा ताण सतत जाणवत होता, अपयशाची चवही चाखावी लागली.

पण सोनालींनी कधी हार मानली नाही. कारण त्यांना ठाम विश्वास होता. “आपल्या गावातून, आपल्या गाई-म्हशींच्या शुद्ध दुधातूनही मोठा उद्योग उभा राहू शकतो.” आज त्या विश्वासाचीच ही फलश्रुती आहे की ‘देसाई डेअरी’चे उत्पादन महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेशासारख्या राज्यांत पोहोचले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे केवळ व्यवसाय नाही तर आपल्या गावातील आणि जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना नवी उमेद मिळाली आहे. सोनालींची कहाणी ही प्रत्येक त्या स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे, जी स्वप्न पाहते आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने झगडते.

‘लेट’ ब्रँडचा प्रवास – गावातून राज्याबाहेरपर्यंत 

सोनाली देसाई यांच्या आयुष्यातील एक मोठं पाऊल म्हणजे ‘लेट’ (Laite) ब्रँडचा जन्म. दुधापुरता व्यवसाय मर्यादित न ठेवता त्यांनी दही, लोणी, ताक, तूप यासारख्या दर्जेदार उत्पादनांची निर्मिती सुरू केली. मात्र, फक्त उत्पादन तयार करून थांबायचं नाही, तर त्याला एक वेगळी ओळख द्यायची होती. ग्राहकांच्या मनात कायम घर करून राहील असं नाव शोधण्याची धडपड सुरू झाली… आणि त्यातूनच जन्म झाला ‘लेट’ या नाविन्यपूर्ण व लक्षवेधी ब्रँडचा.

आज ‘लेट’ ब्रँडची उत्पादने केवळ सिंधुदुर्गापुरती मर्यादित नसून कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबईसह महाराष्ट्राबाहेरील राज्यांतही आपली छाप सोडत आहेत. गावाकडच्या छोट्याशा फॅक्टरीतून सुरू झालेला प्रवास आज शहरांच्या मोठ्या बाजारपेठेत पोहोचला आहे. सोनालींच्या मार्केटिंगच्या अनुभवाचा यामध्ये मोठा वाटा आहे.

त्यांनी स्वतः गोव्यातील मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आपल्या उत्पादनाची चाचणी करून दाखवली. पनीरच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी जेव्हा विश्वास निर्माण केला, तेव्हा सुरुवातीच्या ५० किलो मागणीवरून आज दररोज २०० किलो ऑर्डरपर्यंत वाढ झाली. एवढंच नाही, तर सध्या दररोज तब्बल ७०० किलो मलई पनीर बंगळुरूसारख्या महानगरात ‘लेट’ ब्रँडअंतर्गत पोहोचत आहे.

या यशामागे फक्त सोनालींचा ध्यास नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं योगदानही तितकंच मोलाचं आहे. व्यवसायात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा वडील प्रभाकर देसाई आणि इतर सर्व कुटुंबीय एकसंधपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आज ‘लेट’ हा केवळ एक ब्रँड नाही, तर गावातील मेहनती शेतकऱ्यांचं शुद्ध दूध, सोनालींचा आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या पाठिंब्याची गाथा आहे.

गावातून उगम पावलेला हा प्रवास राज्याबाहेर पोहोचत असताना प्रत्येक ग्रामीण उद्योजकासाठी एक जिवंत प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. माझा प्रवास हा केवळ उद्योग उभारणीचा नाही, तर महिलांच्या सशक्तीकरणाचा आहे, असे सोनाली देसाई ठामपणे सांगतात. त्यांच्या मते, ग्रामीण भागातील महिला योग्य नियोजन, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर नक्कीच यशस्वी उद्योगपती होऊ शकतात. अनेक तरुणी, गृहिणी, शेतकरी महिला—जर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि जिद्दीने पुढे चालत राहिल्या, तर त्या आपल्या स्वप्नांना नक्कीच गाठू शकतात.

सोनालींच्या दृष्टीने ग्राहकांना शुद्धतेचा विश्वास देणे हेच त्यांचे खरं ध्येय आहे, आणि आज तो विश्वासच त्यांची खरी कमाई ठरली आहे. त्यांची ही कहाणी म्हणजे केवळ व्यवसायातील यश नव्हे, तर मेहनतीची शिदोरी, जिद्दीची वाटचाल आणि  आत्मविश्वासाची कमाई आहे.  

सोनालींची यशोगाथा ही एका मुलीच्या स्वप्नांची, तिच्या वडिलांच्या विश्वासाची आणि संपूर्ण कुटुंबाच्या नात्यांची कहाणी आहे. ही कहाणी त्या प्रत्येक स्त्रीची आहे, जी आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यावर, आत्मविश्वासाच्या बळावर आणि अथक परिश्रमाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करते. आज सोनालींचं यश हे फक्त त्यांचं वैयक्तिक समाधान नाही, तर गावातील, जिल्ह्यातील आणि संपूर्ण समाजातील असंख्य महिलांसाठी एक जिवंत प्रेरणा आहे.

- मुकुंद लता मधुकर चिलवंतजिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी कोल्डप्रेस तेल उद्योग एक सुवर्णसंधी; कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय

English
हिंदी सारांश
Web Title : Sonali's hard work and ambition lead to brand's interstate success.

Web Summary : Sonali Desai-Masurkar built a successful dairy brand, Laite, with her father's guidance and hard work. Overcoming obstacles, she expanded from a small milk center to interstate sales, empowering local farmers and women. 'Laite' products now reach Goa, Karnataka, and Andhra Pradesh, showcasing rural entrepreneurship.
टॅग्स :शेतकरी यशोगाथानवरात्रीसिंधुदुर्गमहिलाव्यवसायशेती क्षेत्र