नितीन कांबळेकडा : महाबळेश्वरसह अन्य थंड हवेच्या ठिकाणी घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे (Strawberry) पीक आता ग्रामीण भागातील दुष्काळी तालुक्यातील शिरापूर येथे घेतले असून, याला चांगली मागणीदेखील आहे. ४५ दिवसांत फळ विक्रीसाठी आले असून, ५० हजार रुपये खर्च करून सव्वा लाखांचे उत्पन्न घेत दत्तात्रय जिवे यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे.
आष्टी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम भेडसावतो. वातावरणाचा नेहमीच फटका बसतो. तिथे पारंपरिक पिकाला फाटा देत नवीन तंत्रज्ञान अवगत करून पुणे जिल्ह्यातील मंचर येथील प्रसाद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२४ मध्ये २ हजार ७०० रोपे आणून लागवड करत मल्चिंग, पाण्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर व खते, औषधे यांचा योग्य ताळमेळ साधला.
जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अवघ्या दीड महिन्यात रासायनिक खतांचा कमी पण शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर करत स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती (Strawberry Farming) केली.
लागवड ते फळ विक्रीला येईपर्यंत ५० हजार रुपये खर्च झाला असून, १ लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या स्ट्रॉबेरीची कडा शहरासह तालुक्यात विक्री केली जात आहे.सोशल मीडियाच्या आधारे स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे. तालुक्यात प्रथमच ही शेती करून प्रयोग यशस्वी केल्याचे शेतकरी दत्तात्रय जिवे यांनी सांगितले.
प्रयोग यशस्वी, भविष्यात आणखी लागवड करणार!
सुरुवातीला वाटले नव्हते ही शेती यशस्वी होईल. पण कष्ट, मेहनत घेतल्याने चांगली शेती झाली. आकर्षक फळे आल्याने ४०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. भविष्यात आता स्ट्रॉबेरी शेतीचे क्षेत्र वाढवणार असून, नवनवीन प्रयोग शेतीत करणार असल्याचे शेतकरी पुत्र ऋषिकेश जिवे यांनी सांगितले.
आधुनिक शेतीकडे वळावे
• स्ट्रॉबेरी हे प्रामुख्याने थंड हवेच्या ठिकाणी येणारे फळ आहे. पण आपल्या तालुक्यात शिरापूर येथील शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केला आहे.
• कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शनदेखील केले जाते. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे.
• त्यामुळे कमी कष्टात जास्त पैसा हाती येईल, असे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे म्हणाले.
हे आहेत स्ट्रॉबेरीचे फायदे....
• स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे.
• स्ट्रॉबेरीमध्ये मँगेनीज, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ९ असते.
• रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठीदेखील हे फळ चांगले मानले जाते आणि म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणे आवश्यक आहे. जर आपण ताजी स्ट्रॉबेरी घेऊ शकत असाल, तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.
• स्ट्रॉबेरीचे सेवन हृदयरोग आणि मधुमेहापासून मुक्त करू शकते. आपण कोणत्याही प्रकारे स्ट्रॉबेरी खाऊ शकता, परंतु या हंगामात ते आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे, असे जाणकार सांगतात.हे ही वाचा सविस्तर : Strawberry Crop : महाबळेश्वरपेक्षा 'गोड स्ट्रॉबेरी' आता विदर्भात; कृषी विद्यापीठात पाच जातींवर संशोधन