गोविंद शिंदे
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण हाताला मिळेल ते काम करतो. अनेक ठिकाणी घरातील कर्त्या पुरुषांवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असते. मात्र, अनेकदा स्त्रीयांदेखील आपल्या पतीला हातभार मिळावा, यासाठी छोटे-मोठे काम करून साथ देतात.
अशाच एका महिलेने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुटुंब सांभाळत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनत इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कविता दत्तात्रय कोटलवार असे या यशस्वी महिला उद्योजिकेचे नाव आहे.
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील हिप्परगा येथील कविता कोटलवार यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. ग्रामीण भागातील छोट्याशा गावात राहत असल्यामुळे हाताला काम मिळात नव्हते.
तर पती ही कोणत्या शासकीय नोकरीला नव्हते, मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही तरी उद्योग सुरू करावा म्हणून मजुरीच्या कामातून थोडेफार पैसे जमा करत किराणा दुकान गावात सुरू केले.
किराणा व्यवसायातूनही कमाई होत नव्हती; मात्र घरखर्च या कामातून भागायचा. तेवढ्यात कविता कोटलवार यांना शासनाच्या उमेद अभियानात माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी एका बचत गटाची स्थापना केली. पुढे उमेद अभियानाचे अधिकारी यांच्या सहकार्याने त्यांनी उद्योग व्यवसायाला नवी चालना देण्याचा प्रयत्न केला.
ज्यात सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या मदतीने मसाले पदार्थ करण्याचा निश्चय केला. त्यातून त्यांना एक-एक नवीन संधी मिळू लागली. तसेच मुंबई येथे महालक्ष्मी सरल प्रदर्शनात सहभाग घेतला.
त्यांच्या बचत गटाने केलेले खारोडी मसाले, राजगिऱ्याचे लाडू आणि हळद पावडर यासह इतर मसाले पदार्थ, गुळाचा चहाचा पावडर असे वेगवेगळे उत्पादन निर्माण केले आहे.
मसाले उद्योगातून महिलांना मिळाली रोजगाराची संधी
• बचत गटा माध्यमातून त्यांना तर रोजगार मिळालाच याशिवाय या मसाले उद्योगाच्या माध्यमातून इतरही आठ ते दहा महिलांना यामुळे रोजगाराची संधी निर्माण झाली. आज राज्यभरात त्यांच्या पॅकेज मसाल्यांना चांगली मागणी वाढली आहे.
• या उद्योगाच्या माध्यमातून चांगली कमाई त्या आज रोजी करत असून, त्यांचा मजूरदार ते महिला उद्योजक हा संपूर्ण प्रवास इतर महिलांसाठी चांगला प्रेरणादायी ठरत आहे.