Pune : गावात राहूनही चांगली शेती करून पैसा कमावता येतो आणि शाश्वत जीवनशैली जगता येऊ शकते. त्यासाठी फक्त गरज आहे ती योग्य नियोजनाची आणि सातत्याची. हे दाखवून दिलंय भोर तालुक्यातील बारे खुर्द येथील युवा शेतकरी सौरभ खुटवड याने. त्याने सहा वर्षापूर्वी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सोडला अन् गावी परतून पूर्णवेळ सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला होता.
भोर तालुक्यातील बारे खुर्द या गावात भाटघर धरणाच्या बॅकवॉटर जवळ सौरभची वडिलोपार्जित शेती आहे. तो येथील १४ एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचे प्रयोग करत असतो. पूर्णवेळ सेंद्रीय शेती करत असताना तो केवळ जिवामृत, गांडूळ खत आणि दशपर्णी अर्काच्या माध्यमातून पिकांचे उत्पादन घेतो.
पीके कोणती?त्याच्याकडे सेंद्रीय तांदूळ, भाजीपाला पीके, भुईमूग, पालेभाज्या, फळपीके, कलिंगड, सफरचंद आणि आंबे इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. यासोबतच या सर्व मालाची तो शेतातूनच थेट ग्राहकांना विक्री करतो.
सेंद्रीय कलिंगडाची लागवडतो मागील सहा वर्षांपासून पूर्णवेळ सेंद्रीय शेती करतो. त्याने यावर्षी १५ जानेवारी रोजी कलिंगडाची १८ गुंठे क्षेत्रावर लागवड केली होती. या १८ गुंठे क्षेत्रातून त्याने ११ टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. सेंद्रीय खताचा वापर केल्यामुळे या कलिंगडाला चांगली गोडी आणि लाल रंग आला होता.
व्यवस्थापनखते म्हणून प्रत्येक आठवड्याला जिवामृत आणि गांडूळ खताचा डोस त्याने दिला होता. यासोबतच किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काच्या फवारण्या रोग येण्याआधीच घेतल्या होत्या. यासोबतच चिकट सापळे लावल्यामुळे किड नियंत्रणास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.
या संपूर्ण ११ टन कलिंगडाची विक्री त्याने आणि त्याच्या कुटुंबियाने केली असून प्रति किलो सरासरी १५ रूपयांचा दर त्यांना मिळाला आहे. हा शेतमाल व्यापाऱ्यांना न देता थेट विक्री केल्यामुळे चांगला नफा झाल्याचं सौरभ सांगतो.
सध्या बिघडलेले मातीचे आरोग्य आणि त्याचे मानवाच्या आरोग्यावर होणारे परिणाम यामुळे प्रत्येकाने शाश्वत जीवन जगण्यासाठी सेंद्रीय किंवा नैसर्गिक शेतीचा पर्याय निवडला पाहिजे असं सौरभने लोकमत अॅग्रोशी बोलताना सांगितलं.