Join us

Reshim Sheti Success Story : रेशीम व्यवसायातून हा जिगरबाज युवा शेतकरी महिन्याला घेतोय एक लाखाचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:12 IST

Farmer Success Story कवठे एकंद (ता. तासगाव) येथील जिगरबाज युवक शेतकरी जीवन चिप्रीकर यांनी शेतीत वेगळेपण निर्माण करीत रेशीम शेतीतून प्रगती साध्य केली आहे.

प्रदीप पोतदारकवठे एकंद: पारंपरिक शेतीतील वाढलेल्या समस्या लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या तोट्यात जाणाऱ्या शेतीला चांगले दिवस यावेत.

या उद्देशाने कवठे एकंद (ता. तासगाव) येथील जिगरबाज युवक शेतकरी जीवन चिप्रीकर यांनी शेतीत वेगळेपण निर्माण करीत रेशीम शेतीतून sericulture प्रगती साध्य केली आहे.

या शेतकऱ्याने २०१६ मध्ये रेशीम शेतीला सुरुवात केली. गावातील काही युवक शेतकऱ्यांनाही याबद्दल जागृती करत रेशीम शेतीबद्दल प्रवृत्त केले. बदल स्वीकारून शेती किफायतशीर करता येते हे दाखवून दिले.

बदलते हवामान, वाढती महागाई, अस्थिर बाजारपेठेमुळे शेतीचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पीक पद्धतीला चांगला पर्याय म्हणून कवठे एकंद येथील जीवन चिप्रीकर यांनी रेशीम शेती निवडली.

शेतीला शाश्वतपणा मिळावा, या उद्देशाने रेशीम शेतीत मेहनत घेऊन दीड महिन्याला सुमारे लाखाचे उत्पन्न मिळवता येत असल्याचे दाखवून दिले.

आपल्या बरोबरच इतर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, या हेतूने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न धावता जीवन चिप्रीकर यांनी रेशीम शेतीसाठी पुढाकार घेतला आहे.

शेतीतच वेगळेपण निर्माण करीत रेशीम उद्योगांतून भरीव प्रगती साध्य करून पारंपरिक पीक पद्धतीला चांगला पर्याय खुला करून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

रेशीम शेतीच्या प्रारंभी त्यांनी व्ही-१ जातीच्या तुतीची लागवड केली. २०१६-१७ पासून त्यांनी रेशीम उद्योगाचा अभ्यास व शेतीबाबत सुरुवात केली. ७ फूट बाय दीड फूट आणि साडेचार फूट बाय दोन फूट अशा अंतराने एक एकरचे दोन प्लॉट लागवड केली.

रेशीम किटकांच्या संगोपनासाठी १ हजार ६०० चौरस फुटाचे शेड उभा करून बेदाणे रैंक प्रमाणे रचना केली आहे. सुरुवातीला बाल किटक (चॉकी) यांचे संगोपन जाळीवरती शेडमध्ये केले जाते.

रेशीम किटकांना सकाळ संध्याकाळ खाद्य म्हणून तुतीचा पाला वापरला जातो. २१ दिवसाच्या संगोपन कालावधी नंतर रेशीम कोष तयार होतात.

प्रत्येक दीड महिन्याला किटकांची एक बॅच बसते. त्यामध्ये २५० अंडीपुंज्यांची बॅच चालते. यातून सुमारे २०० ते २२५ किलो उत्पादन मिळते. बाजारभावाप्रमाणे सुमारे ८० हजार ते एक लाखा रुपयेपर्यंत उत्पन्न प्राप्त होते.

उत्पादित रेशीम कोष हे आर.एस.एम. सिल्क याचेकडे विक्री केले जातात. येणाऱ्या पैशातून भाडंवल, व्यवस्थापन खर्च वजा जाता इतर शेतीच्या मानाने चांगले व शाश्वत उत्पादन मिळवता येते. 

रेशीम किटकांचे खाद्य तुती आहे. तुती ही जंगली पद्धतीची असल्यामुळे हवामान व जमीन बदलाचा फारसा परिणाम होत नाही. तृती कमी पाण्यावर व मुरमाड जमिनीत ही चांगली वाढ होते. व्यवस्थापनासाठी कमी मनुष्यबळ लागत असून उत्पन्न चांगले मिळत आहे. आम्हाला दीड महिन्याला लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न निश्चित मिळत आहे. - जीवन चिप्रीकर, शेतकरी, कवठे एकंद, ता. तासगाव

अधिक वाचा: संख गावात ३० एकर शेवग्याच्या शेतीतून समृद्धी आणणाऱ्या डॉक्टरची यशोगाथा; वाचा सविस्तर

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीशेतीपीकव्यवसायशिक्षणनोकरी