Join us

पुण्यातील दौंडमध्ये ४० डिग्री तापमानातही बहरले हिमालयातील सफरचंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 6:13 PM

दत्तात्रय शिवाजी भोसले या शेतकऱ्याने यशस्वी केला अनोखा प्रयोग

 - बापू नवले

दौंड: दौंड तालुक्यातील शिंदेवाडी - पारगाव येथील दत्तात्रय शिवाजी भोसले या शेतकऱ्याने अनोखा प्रयोग करीत सफरचंद फळबागेची लागवड केली आहे. हरमन ९०९ या प्रजातीची निवड दौंड तालुक्याच्या हवामानात ४० डिग्री सेल्सिअस तापमानात देखील टिकते हे सिद्ध झाले आहे. या फळबागेस कमी मनुष्यबळ लागते. मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने सफरचंद फळबाग लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच त्यातून भरघोस उत्पादन मिळवण्याचा निश्चयही त्यांनी केला आहे. 

बागेच्या पाण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाची सोय केली आहे. येथील पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांनी आरो प्लांट बसवला आहे. त्यामधून पाण्याचे शुद्धीकरण करून झाडांना ठिबक सिंचनद्वारे पाणी पोहोचवले जाते. तसे नॉर्मल पाणी देखील या शेतीला चालते मात्र गोडे पाणी सफरचंद शेतीस अधिक पोषक आहे. ४० गुंठ्यामध्ये २८० झाडे त्यांनी लावली आहेत.

हिमाचल प्रदेश येथील (मनाली) त्यांचे मित्र हरमन शर्मा यांच्याकडून माहिती घेतली व तेथूनच या रोपांची खरेदी केली. नुकतीच या झाडांना फळे लागली होती. परंतु ते पुढील वर्षी त्याचा बहार धरणार आहे. येत्या डिसेंबर पर्यंत या झाडाला फुले येतील. अंदाजे पुढील चार महिन्यांमध्ये या झाडांना फळे लागतील. पहिला बहार स्थानिक बाजारपेठेत विक्री करणार आहेत. सफरचंद फळबागेचे वैशिष्ट्य असे आहे की सफरचंदाचा बाजार भाव कायमस्वरूपी स्थिर असतो. सफरचंद शेतीस मशागत करण्यासाठी थोडेफार मनुष्यबळ लागते. - दत्तात्रय भोसले, शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीअॅपलपुणेदौंड