जगन्नाथ कुंभारमसूर : कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव रामचंद्र पाटील आणि बंधू निवासराव आणि विलास पाटील यांनी गावातीलच डोंगराळ कपारीत डाळिंबाची बाग बहरवली आहे.
त्यांनी अवघ्या दोन एकर क्षेत्रातून सुमारे २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तसेच त्यांच्या सीताफळ, आंबा, नारळ, अंजीर आदींच्या फळबागाही आहेत. डाळिंब आणि सीताफळाची परदेशातही निर्यात होत आहे.
पाडळी (हेळगाव) येथे पाटील बंधूंनी डोंगराळ भागातील खडक व टेकडी फोडून जमिनीचे सपाटीकरण केले. परिसरातील बंधाऱ्यांमध्ये असणारी माती आणून जमीन सुपीक केली.
मागील १५ वर्षे शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. तसेच शेतीसाठी सिंचनाची सोयही पाच किलोमीटर अंतरावरून केलेली आहे.
आज त्या ठिकाणी डाळिंब, सीताफळ, आंबा, नारळ, अंजीर आदींच्या फळबागा आहेत. यासोबतच आले, ऊस ही पिकेही घेतली जात आहेत.
पाडळीतील दोन एकर क्षेत्रात त्यांनी डाळिंबाची सुमारे ६५० झाडांची लागवड केली आहे. सुरुवातीची दोन वर्षे झाडे लहान असल्यामुळे उत्पन्न कमी मिळत होते.
त्यानंतर योग्य संगोपनातून झाडांची वाढ झाल्याने उत्पन्नही वाढू लागले. भगवा या जातीचे डाळिंब फळे-फुलोऱ्यापासून परिपक्व होण्यासाठी १८० दिवस लागतात. त्यानंतर त्याची काढणी केली जाते.
एका झाडाला सुमारे ४५ किलो उत्पादन मिळत आहे. या बागेसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रकारे समतोल राखण्यात आला आहे.
तसेच फळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडी येथील प्रगतशील शेतकरी गणेश धुमाळ आणि इतर सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार डाळिंब व इतर फळबागांचे संगोपन करण्यात येत आहे.
मागील पाच वर्षांपासून डाळिंब व सीताफळे चांगल्या प्रतीची मिळत आहेत. त्यामुळे या फळांची श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश आणि नेपाळ या देशांत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून निर्यात होत आहे. निर्यातीच्या फळांना चांगला दरही मिळत आहे.
माणिकराव पाटील व त्यांच्या बंधूनी अवघ्या दोन एकर क्षेत्रातून सुमारे २६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तसेच त्यांच्या सीताफळ, आंबा, नारळ, अंजीर आदींच्या फळबागाही आहेत.
शिवारात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेत◼️ प्रगतशील शेतकरी माणिकराव पाटील हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांचे मूळगाव घोणशी आहे.◼️ गावापासून ३५ किलोमीटर अंतरावरील पाडळी येथे रोज ये-जा करतात.◼️ शेती व फळबाग कामासाठी दोन मजूर कुटुंबे मुक्कामासाठी ठेवण्यात आली आहेत.◼️ शेतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही ६ बसविण्यात आलेले आहेत.
देवाने पृथ्वी निर्माण केली. मग त्याच्या मनात विचार आला माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून त्यांनी शेतकरी राजा निर्माण केला. सर्व शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून शेती केल्यास नक्कीच फायदा होत असतो. - माणिकराव पाटील, शेतकरी
अधिक वाचा: घरबसल्या मिळवा आता दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज; केंद्र सरकारने सुरु केले 'हे' नवे पोर्टल
Web Summary : Manikrao Patil transformed barren land into a pomegranate farm, earning ₹26 lakhs from two acres. He also cultivates other fruits and exports pomegranates and custard apples. Patil uses innovative farming techniques and CCTV for security.
Web Summary : माणिकराव पाटिल ने बंजर जमीन को अनार के खेत में बदल दिया, जिससे दो एकड़ से ₹26 लाख कमाए। वह अन्य फल भी उगाते हैं और अनार और सीताफल का निर्यात करते हैं। पाटिल नवीन कृषि तकनीकों और सुरक्षा के लिए सीसीटीवी का उपयोग करते हैं।