Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील मागणी आणि भाजीपाला लागवड; निमगावातील शेतकऱ्याला फ्लॉवरने केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:35 IST

निमगाव परिसरात सुमारे शेकडो एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले आहे. निमगाव येथील सातपुतेवस्ती वरील भाऊसाहेब सातपुते व पत्नी साधना सातपुते यांनी एक एकर क्षेत्रात फ्लॉवर पीक घेतले होते.

राजेंद्र मांजरेनिमगाव (ता. खेड) या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फ्लॉवरचे पीक घेतले आहे. सध्या पंधरा ते वीस रुपये प्रति किलो फ्लॉवर या पिकाला बाजारभाव मिळत असून लाखो रुपयांची उलाढाल या परिसरात झाली असल्याचे चित्र दिसत असून फ्लॉवर उत्पादक शेतकरी मालामाल झाला आहे.

निमगाव खंडोबा या परिसरात शेतकरी काही वर्षांपासून फ्लॉवर या पिकाचे उत्पादन घेत आहेत. यंदा चांगला दर पिकाला मिळत आहे. निमगाव या परिसरातून एका बाजूने चासकमान धरणाचा डावा कालवा दुसऱ्या बाजूने भीमा नदी असल्यामुळे येथे बाराही महिने पाण्याची उपलब्धता होते.

निमगाव परिसरात सुमारे शेकडो एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले आहे. निमगाव येथील सातपुतेवस्ती वरील भाऊसाहेब सातपुते व पत्नी साधना सातपुते यांनी एक एकर क्षेत्रात फ्लॉवर पीक घेतले होते.

लागवडीपासून पीक काढणीपर्यंत सुमारे ५० हजार रुपये खर्च झाला त्यांना अडीच लाख रुपये निव्वळ नफा राहिला, बाजारपेठेचा अभ्यास करून भाजीपाल्याची शेती केली पाहिजे. बाजार पेठेची मागणी वेगळी, अन् आपले उत्पादन वेगळे असेल तर शेती परवडत नाही.

सर्वच ठिकाणी फ्लॉवर या पिकाला चांगला भाव मिळतो. हा भाव वर्षभर उत्पादकाला परवडेल, असा असल्यामुळे ही शेती लाभदायक असल्याचे फ्लॉवर उत्पादक शेतकरी भाऊसाहेब सातपुते यांनी सांगितले.

फ्लॉवरचे पीक काढणीला आल्यानंतर, एका गड्डीला किमान ३ किलो पाला निघतो. हा पाला शेतातच कुजवला तर तो खत म्हणून अतिशय उपयोगी ठरते. या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन ते तीन एकर क्षेत्रात फ्लॉवर हे पीक घेतले आहे. सध्या प्रति किलोला १५ ते १८ रुपये बाजार भाव मिळत आहे. येथील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट व्यापारी येत असून सौदा करीत आहे. काही शेतकरी पुणे-मुंबई येथे पीक विक्रीसाठी पाठवत आहे. - भाऊसाहेब सातपुते, शेतकरी, निमगाव, ता. खेड

टॅग्स :शेतकरीशेतीभाज्याबाजारसेंद्रिय खतखेड