नियतीने एखाद्यावर संकटाचा भडिमार करावा अन् समोरच्यानेही तेवढ्याच चोखपणे संकटांचा सामना कसा करावा हे साक्षी नावाच्या २० वर्षीय मुलीकडे बघून कळतं. कधीच बरा न होणाऱ्या आजाराने वडिलांचं निधन होतं, ज्या वयात दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे त्या वयात काम करावं लागतं, तरीही अभ्यासाकडं दुर्लक्ष न करता डॉक्टर होण्याचं स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकीची ही कथा. साक्षी गोंटे असं तिचं नाव.
साक्षीचे वडील दिलीप गोंटे हे मूळचे शेतकरी जरी असले तरी ते शिरूर नगरपरिषदेमध्ये रोड लेबर या पदावर काम करत होते. सुट्टीच्या दिवशी किंवा काम संपल्यानंतर ते श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या आपल्या शेतातील काम करायचे. साधारण दीड वर्षांपूर्वी दिलीप यांना ALS नावाचा आजार झाला. कधीही बरा न होऊ शकणाऱ्या आजारांपैकी हा एक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं अन् या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.
आईही आजारी असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी साक्षी अन् तेजसवर आली. घरातील कर्ता पुरूष अंथरूणाला खिळून पडल्यामुळे १९ वर्षाच्या साक्षीला अन् तिच्या तेजस नावाच्या लहान भावाला पार्ट टाईम काम करावं लागलं. पण साक्षीने अभ्यासात हयगय केली नाही. १२ वी झाल्यानंतर 'नीट' परिक्षेचा अभ्यास करून तिने एमबीबीएसला प्रवेश मिळवला. पण हे यश नियतीला जास्त काळ बघवलं नाही. आजारपणानंतर सहाच महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२४ मध्ये दिलीप यांचं निधन झालं अन् हे कुटुंब पोरकं झालं.
वडिलांच्या निधनानंतर मिळालेला ५० हजारांचा चेक, आईने महिला बचत गटातून काढलेले लोन अन् नातेवाईंकाची मदत यातून साक्षीच्या पहिल्या वर्षाची फी भरली. तिचा १९ वर्षांचा लहान भाऊ अजूनही कंपनीत काम करून कुटुंब चालवतो अन् काही पैसे साक्षीला पाठवतो.
साक्षी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकते. कॉलेज फी, हॉस्टेल फी, शैक्षणिक साहित्य अन् दैनंदिन खर्च मिळून वर्षाकाठी तिला ४ लाखांच्या आसपास खर्च लागतोय. नातेवाईकांचाही तिला सपोर्ट मिळतोय पण वडिलांच्या आजारपणामुळे झालेल्या कर्जाचा डोंगर साक्षी अन् तिच्या कुटुंबावर उभा आहे.
लहान भावाचं कष्ट अन् घरातील नाजूक परिस्थितीच आज साक्षीसाठी प्रेरणा ठरलीये. या परिस्थितीवर मात करून वडिलांच्या स्वप्नातील चांगली डॉक्टर होण्याचं, एमबीबीएस केल्यानंतर एमडी करून आईला आणि कुटुंबाला स्थिरस्थावर करण्याचा विचार साक्षीचा आहे. पण आपल्या शिक्षणासाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी १९ वर्षाच्या भावाला शिक्षणापासून लांब रहावं लागतं याची रूखरूख तिच्या मनात कायम आहे...!