- गोपाल लाजूरकर
गडचिरोली : पती दुसऱ्या एका व्यक्तीकडे वेल्डिंगच्या कामावर जात असत. एके दिवशी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यामुळे खिन्न झालेल्या त्या महिलेने उमेदच्या माध्यमातून कर्ज प्राप्त करून स्वतःचा वेल्डिंग व्यवसाय (Welding Business) थाटला, आता ती महिला मोठ्या हिमतीने हा व्यवसाय करीत आहे. मनात जिद्द असली तर मार्ग आपोआप गवसतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. प्राजक्ता प्रकाश कोसरे असे या प्रयोगशील महिलेचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) कुरखेडा तालुक्याच्या नवरगाव येथील प्राजक्ता कोसरे ह्या उमेद अभियानाशी जुळलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम हे अभियान करीत आहे.
महाराष्ट्रातील महिलांनी उमेदच्या (Umed) महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून आपला व्यवसाय यशस्वीपणे पुढे घेऊन गेलेल्या आहेत. प्राजक्ता कोसरे यापैकीच एक आहेत. यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आत्मविश्वास डळमळू न देता स्वतःचा वेल्डिंग व्यवसाय उभारला, आता त्यांना अन्य कारागिरांचीसुद्धा मदत होते.
बचत गट, बँकेतून काढले कर्ज
प्राजक्ता कोसरे यांचे पती दुसऱ्याकडे वेल्डिंग कामावर जात असत. कामावर असताना त्यांचा अपघात झाला. यातून सावरून त्यांनी हिंमतीने आपला स्वतःचा वेल्डिंगचा व्यवसाय सुरु केला. बचत गटातून, बँकेतून कर्ज काढून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसाकरिता लागणाऱ्या मशीन खरेदी केल्या. त्यांना आजपर्यंत ५ लाख रुपयांचे कर्ज उमेद व बँकेच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. तालुका व्यवस्थापक (सेंद्रीय शेती) कैलास बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा व्यवसाय उभारला.
घरातूनच केली सुरूवात
सुरुवातीला घरीच चालू केलेल्या आपल्या व्यवसायाला पुढे त्यांनी जेवर्धा येथे दुकान लावले. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु त्यांनी आत्मविश्वासाने विपरित स्थितीचा सामना केला. आज त्या यशस्वीपणे आपल्या कुटुंबाचा गाडा वेल्डिंगच्या व्यवसायावर चालवीत आहेत.
हिरकणी पुरस्कार
प्राजक्ता कोसरे यांना त्यांचा व्यवसाय उभारणीसाठी उमेदच्या जिल्हा व तालुका टीमच सहकार्य लाभले. उमेद अभियानाशी जुळलेल्या त्यांच्या बचत गटाला तालुका व जिल्हा स्तरावरील हिरकणी पुरस्कार मिळाला होता. राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या बचत गटाला गौरविण्यात आले होते.