Join us
Daily Top 2Weekly Top 5

Women Farmer Success Story : हातात रिमोट, आकाशात ड्रोन! लातूरच्या रोहीणीताईंची शेतीत 'हायटेक' भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:21 IST

Women Farmer Success Story : लातूर तालुक्यातील गंगापूर येथील रोहिणी शिंदे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवा आदर्श निर्माण केला आहे. ड्रोनच्या (Drone Didi) सहाय्याने शेकडो एकरांवर औषध फवारणी करत त्यांनी आर्थिक प्रगती साधली असून त्यांच्या या यशामुळे ग्रामीण महिलांना नवी प्रेरणा मिळत आहे. (Women Farmer Success Story)

रामकिशन भंडारे

'शिक्षण कमी असले तरी जिद्द मोठी असली तर यश नक्की मिळते,' हे लातूर तालुक्यातील गंगापूर येथील रोहिणी पंकज शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. (Women Farmer Success Story)

केवळ दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या या गृहिणीने आधुनिक ड्रोन (Drone Didi) तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीत नवे पर्व सुरू केले आहे. (Women Farmer Success Story)

हातात ड्रोनचा रिमोट आणि डोळ्यासमोर मोठे स्वप्न ठेवून त्यांनी यंदा तब्बल ९०० एकर शेतीवर औषध फवारणी पूर्ण केली आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.(Drone Didi)

पारंपरिक शेतीतून हायटेक शेतीकडे वाटचाल

रोहिणी शिंदे यांचे पाच जणांचे कुटुंब असून कुटुंबाकडे सुमारे १५ एकर बागायती शेती आहे. सुरुवातीला त्या पारंपरिक पद्धतीने शेती करत होत्या. मात्र, 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'शी जोडल्या गेल्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. त्यांनी गावात 'साथी स्वयंसाहाय्यता समूह' स्थापन केला आणि महिलांना एकत्र आणण्याचे काम सुरू केले.

गटामध्ये काम करताना त्यांची नेतृत्व क्षमता आणि कामाची जिद्द लक्षात आल्यामुळे त्यांची 'ड्रोन दीदी' प्रशिक्षणासाठी निवड झाली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

कठोर प्रशिक्षणानंतर मिळाले ड्रोन पायलट लायसन्स

ड्रोन उडवणे हे तांत्रिक आणि जबाबदारीचे काम असल्यामुळे रोहिणी यांनी त्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पीबीसी एअरो हब येथे १२ दिवसांचे सघन प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये ड्रोन उडवण्याचे तंत्र, सुरक्षा नियम आणि शेतीतील फवारणीचे तांत्रिक पैलू शिकवण्यात आले.

प्रशिक्षणानंतर झालेल्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांना अधिकृत ड्रोन पायलट लायसन्स मिळाले. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे पिकानुसार फवारणीची उंची, औषधांचे प्रमाण आणि प्रेशर याबाबत विशेष प्रशिक्षणही त्यांनी घेतले.

सन २०२४ मध्ये त्यांना ड्रोन आणि बॅटरी संच प्रदान करण्यात आला आणि तेव्हापासून त्यांच्या हायटेक शेती प्रवासाला खरी सुरुवात झाली.

सुरुवात मोफत सेवेतून, आज मोठी मागणी

ड्रोनच्या माध्यमातून शेतीत फवारणी करण्याची कल्पना अनेकांसाठी नवीन असल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडी शंका होती. त्यामुळे रोहिणी यांनी स्वतःच्या शेतात आणि शेजारच्या शेतात मोफत फवारणी करून विश्वास संपादन केला.

२०२३-२४ मध्ये त्यांनी केवळ ५० एकरांवर फवारणी करून सुरुवात केली. पुढील वर्षी २०२४-२५ मध्ये हा आकडा ४५० एकरांवर पोहोचला.

यंदा मात्र त्यांच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून लातूर, औसा, रेणापूर आणि चाकूर तालुक्यात तब्बल ९०० एकरांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली आहे.

कमी वेळात अधिक काम

ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यामुळे वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होते.

रोहिणी शिंदे सांगतात, एका एकर क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी केवळ ७ ते १२ मिनिटे लागतात. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर फवारणी करता येते आणि मजुरीचा खर्चही कमी होतो.

फवारणीसाठी त्यांनी खालीलप्रमाणे दर निश्चित केले आहेत:

सोयाबीन, तूर, हरभरा – एकरी ५०० रुपये

ऊस – एकरी ७०० रुपये

आंबा बाग – एकरी १००० रुपये

या सेवेमुळे यंदा त्यांनी सुमारे ५ लाख रुपयांची उलाढाल केली आहे.

आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल

कामाचा विस्तार वाढवण्यासाठी रोहिणी यांनी 'उमेद' योजनेतून १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि अतिरिक्त बॅटरी संच खरेदी केले. त्यामुळे ड्रोनचे काम अधिक वेगाने आणि सातत्याने करता येऊ लागले.

ड्रोनमुळे मी आज लखपती झाले आहे. मला 'उमेद'मुळे भरारी घेण्याचे बळ मिळाले. मांजरा केव्हीकेचेही मोठे सहकार्य मिळाले. माझ्या कुटुंबाला हातभार लावता येतोय, याचा मला अभिमान आहे.-रोहीणी शिंदे, शेतकरी

ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण

आज रोहिणी शिंदे या केवळ शेतकरी महिला नाहीत, तर ड्रोन पायलट आणि ग्रामीण उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कामामुळे अनेक महिला शेतीत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यास प्रेरित होत आहेत.

हातात रिमोट आणि मनात जिद्द असेल तर ग्रामीण महिलाही शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून आर्थिक प्रगती करू शकतात, हे रोहिणी शिंदे यांच्या यशस्वी प्रवासाने सिद्ध करून दाखवले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Budget 2026 : महिला शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात दिलासा; 'या' योजनांमुळे मिळणार आधार

अधिक वाचा : Women Farmer Success Story : शेती म्हणजे नोकरीच; समृद्धीची वाट दाखवणारी आशाताईंची यशकथा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजनामहिला