- अनिरुद्ध पाटील
“पारंपरिक जांभळाच्या झाडांमधून आपण जांभळट फळं पाहिली आहेत… पण कधी पांढऱ्या जांभळाबद्दल ऐकलंय का? तर रंगाने वेगळं, चवीने खास आणि बाजारात वाढती मागणी असलेलं ‘पांढरं जांभूळ’ आता शेतकऱ्यांसाठी नवा उत्पन्नाचा मार्ग ठरत आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील डॉ. सुमित मधुकर ढाक या आदिवासी युवकाने दुर्मिळ पांढऱ्या जांभळाची शेती करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील बाहाडोली हे गाव काळ्या जांभळासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याने त्याची ख्याती सर्वदूर आहे. या जिल्ह्यात चविष्ट काळ्या जांभळासह आता मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील पांढऱ्या जांभळाची चव देखील चाखता येणार आहे. डॉ. ढाक हे डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील असून त्यांनी २०११ साली कृषीची एमटेक पदवी घेतली.
तसेच २०१५ साली मृद व जलसंधारण अभियांत्रिकीत पीएचडी केली. जर्मनीच्या लंबर्ट अकॅडमी पब्लिकेशन्सने त्यांचा प्रबंध प्रकाशित केला. आदिवासी समाजातून देशातील सर्वात कमी वयात पीएचडी प्राप्त केल्याने राज्य सरकारने २०१९ साली आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी मोखाडा येथे प्रत्यक्ष शेती कसण्यास सुरुवात केली.
पांढऱ्या जांभळाचे लागवड तंत्रज्ञान
जून २०२३ साली त्यांनी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नर्सरीतून थायलंड व्हाईट जांभळाची १०० रोपे आणली. १२ फूट लांब आणि १० फूट रुंद अशी लागवड केली. शेणखत तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाणी व विद्राव्य खतांचे व्यवस्थापन केले. या सर्वांसह मजुरीवर वर्षाकाठी ३० हजार रुपये खर्च अपेक्षित होता.
आंतरपीक - खरबूज, कलिंगडाची लागवड
त्या अनुषंगाने आंतरपीक म्हणून पहिल्या वर्षी खरबूज लागवडीतून २२ हजार रुपये तर दुसऱ्या वर्षी कलिंगड लागवडीतून ५० हजारांचा नफा मिळवला. त्याद्वारे जांभूळ शेतीसाठी आलेला खर्च भरून निघाल्याचे डॉ. ढाक सांगतात. ३ वर्षानंतर या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर येऊन पांढरी जांभळे गुच्छाने लगडली आहेत. प्रती झाड ५ ते ६ किलो उत्पादन अपेक्षित असून १५० ते १६० रुपये प्रतिकिलो फळांना बाजारभाव आहे. उत्पादन खर्च वजा जाता पहिल्याच वर्षी ५० हजारांचा नफा त्यांना अपेक्षित आहे.
आरोग्यदायी पांढरे जांभूळ
या जांभळाच्या झाडांची उंची कमी असते. ३ वर्षांपासूनच फळधारणा सुरू होते. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने पालघरसह नाशिक व कोकणातील उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे असे डॉ. ढाक सांगतात. रोपांची उपलब्धता, लागवड तंत्रज्ञान इ. मार्गदर्शन करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
काळ्या जांभळाप्रमाणेच पांढरी जांभळही आयुर्वेदिक गुणधर्मयुक्त आणून मधुमेह, किडनी विकार रुग्णांसाठी लाभदायक आहेत. हे फळ दुर्मिळ व चविष्ट असल्याने बाजारात मागणी असते. मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे व विक्रमगड तहसीलदार मयुर चव्हाण यांनाही या फळांचा गोडवा आवडल्याने त्यांनी प्रयोगशील शेतीचे कौतुक केले.
