Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sericulture Farming : सेलूच्या मातीत फुलला आंध्रचा 'रेशीम मॉडेल'; शेतकऱ्याचा यशाचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:40 IST

Sericulture Farming : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर रेशीम उद्योगात मोठे यश मिळवले आहे. आंध्र प्रदेशातून प्रशिक्षण घेऊन सुरू केलेला हा प्रयोग आज मराठवाड्यातील ५०० हून अधिक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. (Sericulture Farming)

रेवणआप्पा साळेगावकर

पारंपरिक शेतीतील अनिश्चितता, निसर्गाच्या लहरीपणा आणि कमी उत्पन्नामुळे अनेक शेतकरी हतबल होत असताना, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जिद्द, अभ्यास आणि नव्या प्रयोगांच्या जोरावर यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. (Sericulture Farming)

संजय पांडुरंग नाईकवाडे यांनी केवळ तीन एकर शेतीतून रेशीम उद्योग उभा करत स्वतः सह मराठवाड्यातील तब्बल ५०० शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून टाकले आहे.(Sericulture Farming)

तीन एकरांतून उभी केली रेशीम क्रांती

संजय नाईकवाडे यांच्याकडे फक्त तीन एकर शेती. पारंपरिक पिकांमधून मर्यादित उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक एकर क्षेत्रावर 'व्ही-१' या प्रगत वाणाच्या तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादनाचा प्रयोग सुरू केला.

सुरुवातीला हा निर्णय धाडसी वाटत असला, तरी त्यामागे अभ्यास आणि मेहनतीची भक्कम जोड होती.

रेशीम उद्योगातील बारकावे समजून घेण्यासाठी त्यांनी थेट आंध्र प्रदेश गाठले. तेथे तब्बल ९० दिवसांचे कठोर प्रशिक्षण घेत त्यांनी या व्यवसायाचे संपूर्ण तंत्र आत्मसात केले.

प्रशिक्षणानंतर त्यांनी गावात परत येऊन स्वतः चे 'चॉकी रिअरिंग सेंटर' अर्थात रेशीम अळी बालसंगोपन केंद्र सुरू केले.

दरमहा १६ बॅचेसचे उत्पादन

आज संजय नाईकवाडे यांच्या केंद्रातून दरमहा १३ ते १६ बॅचेसचे दर्जेदार रेशीम उत्पादन घेतले जाते.

त्यांच्या केंद्रात तयार होणाऱ्या अळ्यांची मागणी मराठवाड्यासह इतर भागांतही वाढली आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारा हा व्यवसाय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी हा उद्योग केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. आपल्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून त्यांनी मराठवाड्यातील सुमारे ५०० शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाशी जोडले. आज हे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, अनेक कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आले आहे.

पत्नी आणि मुलांची भक्कम साथ

या संपूर्ण प्रवासात संजय नाईकवाडे यांना त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. पत्नी अनिता नाईकवाडे, तसेच मुलगे दीपक आणि दिनेश यांनी व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम केले. कुटुंबाच्या एकजुटीमुळेच हा उद्योग आज मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे.

मानाच्या पुरस्काराने गौरव

संजय नाईकवाडे यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. पुणे येथील नामांकित 'तिफण फाउंडेशन'ने त्यांना प्रतिष्ठेचा 'अॅग्रीकल्चर डीलरशिप अवॉर्ड' प्रदान करून सन्मानित केले.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

'५०० शेतकरी सन्मानाने उभे राहिले, हेच मोठे समाधान'

आंध्र प्रदेशातील प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाच्या आणि जिद्दीच्या जोरावर मी हे रेशीम केंद्र सुरू केले. आज माझ्यासोबत मराठवाड्यातील ५०० शेतकरी बांधव या उद्योगात सन्मानाने उभे राहिले आहेत. त्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आलेली पाहून मला सर्वात जास्त आनंद होतो.- संजय नाईकवाडे, शेतकरी

मराठवाड्यासाठी नवा आदर्श

पाण्याची कमतरता, हवामानातील बदल आणि पारंपरिक शेतीतील तोट्याच्या पार्श्वभूमीवर रेशीम उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय ठरत आहे.

कमी क्षेत्रात, नियोजनबद्ध पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठे उत्पन्न मिळू शकते, हे संजय नाईकवाडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

सेलूच्या मातीत रुजलेला हा रेशीम पॅटर्न आता मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये आशेचा किरण ठरत असून, शेतकऱ्यांसाठी प्रेरणेचा नवा मार्ग बनला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Farming Alert : कापूस शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी सरकारचे नवे नियोजन

अधिक वाचा : Monsoon Arrival Date : मान्सूनने घेतली वेगवान धाव; महाराष्ट्रात 'या' दिवसापासून बदलणार हवामान

English
हिंदी सारांश
Web Title : Sericulture Success: Farmer's Andhra Model Transforms Lives in Selu

Web Summary : Sanjay Naikwade, a farmer from Selu, revolutionized sericulture, transforming 500 farmers' lives. Inspired by Andhra Pradesh's model, he cultivated silk on three acres, creating a thriving business and inspiring others in Marathwada. His family's support and recognition have solidified his success.
टॅग्स :शेती क्षेत्ररेशीमशेतीशेतकरीशेती