Join us
Daily Top 2Weekly Top 5

मका उत्पादनाचा नवा पॅटर्न, तब्बल 20 हजार क्विंटलचे विक्रमी उत्पन्न, कसा मिळाला एकरी 30 क्विंटलचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:20 IST

Maize Farming : या हंगामात तब्बल २० हजार क्विंटल मक्याचे विक्रमी उत्पन्न घेण्याची किमया येथील शेतकऱ्यांनी साधली आहे.

- भीमराव मेश्राम 

Maize Farming : शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करण्यात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी मका उत्पादनात मोठी आघाडी घेतली आहे. 

पारंपरिक धान पिकाला फाटा देत तांत्रिक आणि रासायनिक शेतीची जोड दिल्याने एकट्या शंकरनगरमधून या हंगामात तब्बल २० हजार क्विंटल मक्याचे विक्रमी उत्पन्न घेण्याची किमया येथील शेतकऱ्यांनी साधली आहे.

मका पीक हे कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणारे पीक आहे. धान पिकाला लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत मक्याला फारच कमी पाणी लागते. तसेच मक्याचे दाणे वजनदार असल्याने उत्पादनात वाढ होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा कल या नगदी पिकाकडे अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. मक्याचे उत्पन्न वाढले असले तरी, भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी २४०० रुपये प्रतिक्विंटलने विकला जाणारा मका आज १८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादनात आघाडी घेऊनही भावातील या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंतेची लाट आहे. असे असले तरी, धानाच्या तुलनेत हे पीक अधिक फायदेशीर असल्याचे शेतकरी सांगतात. या उत्पन्नाच्या जोरावर गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर, धान्य व मका मळणी यंत्रे घेतली असून, प्रत्येक शेतात सिंचनासाठी विहिरी, बोअरवेल, शेततळे आणि शासनाच्या मदतीने 'पॅक हाउस'ची निर्मिती केली आहे.

एकरी ३० क्विंटलचा उतारा
शंकरनगर हे गाव सुधारित शेती पद्धतीसाठी ओळखले जाते. येथील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पीक पद्धतीत मका लागवड क्षेत्राचा विस्तार केला. स्वतः शेतात अंगमेहनत करून आणि आधुनिक मशागतीवर भर दिल्याने यंदा एकरी सरासरी ३० क्विंटलचा उतारा मिळाला आहे. भरघोस उत्पन्न आर्थिक प्रगतीत भर घालत आहे.

८०० एकरांत पसरले मक्याची लागवड
शंकरनगरच्या शिवारात पाऊल ठेवताच आजवर दिसणारे धानाचे लोंबते तुरे यंदा गायब असल्याचे जाणवते. त्याऐवजी नजरेच्या टप्प्यात जिथे पाहावे तिथे केवळ डोलणारे मक्याचे पीकच दिसून येत आहे. यावर्षी गावातील शेतकऱ्यांनी सुमारे ८०० एकरवर मका लागवड केली. एकेकाळी केवळ पावसाळी पिकांवर अवलंबून राहणारा हा परिसर आता उन्हाळ्यातही 'मका क्रांती'मुळे हिरवागार दिसत आहे.

शेतातील पिकांची ही दाटी आणि भरघोस आलेली कणसे पाहता, शंकरनगरने जणू मका उत्पादनाचा नवा पॅटर्नच जिल्ह्यासमोर मांडला आहे. ८०० एकरांतील या लागवडीमुळे संपूर्ण शिवाराचे रूप पालटले असून, हे क्षेत्र आता मका उत्पादनाचे 'हब' म्हणून ओळखले जात आहे.

मका पिकाला खत, औषधी आणि मेहनतीची गरज अधिक असते, हे खरे आहे. मात्र, धान पिकाच्या तुलनेत याला पाणी अत्यंत कमी लागते. मका हे वजनदार पीक असल्याने धानाच्या तुलनेत ते अनेक पटीने फायदेशीर ठरते. म्हणूनच आम्ही या पिकावर भर दिला आहे.
- वासुदेव सरकार, शेतकरी, शंकरनगर.

 

 

 

आता पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी आणि आधार अपडेट करून मिळेल, वाचा सविस्तर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmers Achieve Record Maize Yields with Innovative Farming Practices.

Web Summary : Farmers in Shankarnagar, Maharashtra, achieved record maize yields using modern techniques, harvesting 20,000 quintals. Despite price fluctuations, farmers are benefiting from increased production, averaging 30 quintals per acre, and investing in infrastructure.
टॅग्स :मकाशेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रशेतकरी