Join us

Success Story : मॅकेनिकल इंजिनीअर झाला प्रयोगशील शेतकरी, फुलविली मक्याची शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 5:36 PM

मॅकेनिकल इंजिनीअरने शेतीची कास धरत व शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत यशस्वी शेती करून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे.

-  अमरचंद ठवरे

गोंदिया :शेतीचे महत्त्व आता सर्वांना कळू लागले आहे. त्यामुळेच शेतीकडे आता युवकसुद्धा वळू लागले आहेत. मॅकेनिकल इंजिनीअरने शेतीची कास धरत व शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत यशस्वी शेती करून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे. सद्यस्थितीत तब्बल ९ एकर शेत शिवारात त्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. हेमकृष्ण जयदेव कापगते असे मॅकेनिकल इंजिनीअर युवकाचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देऊळगाव/बोदरा येथील जयदेव शामराव कापगते हे पूर्वाश्रमीचे पाटील. वतनदारीने आजही त्यांच्याकडे १६ एकर शेती आहे. अख्खे कुटुंब शिक्षित आहे. शेती हाच एकमेव उद्योग. जयदेव पाटील कापगते यांनी १ मुलगा व २ मुलींना शेती व्यवसायातून उच्च शिक्षित केले. दोन्ही मुली संसारात रमल्या. जयदेव व मंगला कापगते यांना हेमकृष्ण कापगते एकुलता एक मुलगा. आपला मुलगा उच्च शिक्षित होऊन चांगल्या पदावर कामाला, नोकरीवर लागावा अशी आई-वडिलांची इच्छा होती. १६ एकर शेतीची मशागतीची कामे आई-वडील करायचे. शेती व्यवसायातूनच २ मुली व १ मुलाच्या शिक्षणासह सुसंस्कारित करून संगोपन केले.

मक्याची यशस्वी शेतीपरंपरागत शेतीला बगल देऊन हेमकृष्ण कापगते याने आधुनिक तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करण्यावर त्याचा सर्वाधिक भर आहे. दोन भागामध्ये शेतशिवार पसरले आहे. ४ बोअरवेलच्या माध्यमातून पाइपलाइनद्वारे संपूर्ण शेतशिवारात जलसिंचनाची सोय केली आहे. हातामध्ये पाणी असल्याने ‘विकेल ते पिकेल’ या तत्त्वानुसार विविध पिकांची लागवड करण्याकडे त्यांचा कल आहे. ९ एकर शेत शिवारात यावेळी त्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. शेती नियोजनात कोणतीही तडजोड नाही. यावर ठाम राहून कृषितज्ज्ञांचा सल्ला घेतात. मक्याची ते यशस्वी शेती करीत आहेत.

युवकांना दिली दिशाहेमकृष्ण कापगते याचे नागपूर येथे  शिक्षण झाले. मॅकेनिक इंजिनीअर झालेल्या या युवकाचे मन शहरात रमले नाही. आई-वडिलांची प्रकृती साथ देत नव्हती. जन्मदात्यावर शस्त्रक्रिया झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हेमकृष्णवर आली. इतरत्र कामाच्या शोधात न राहता आपल्या मालकीच्या शेतीमध्ये मनाजोगे उत्पादन घेण्याचे त्यांनी पक्के केले. आई-वडिलांच्या सहवासात राहून उत्तम शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रयोगशील शेतकरी हेमकृष्ण कापगते १६ एकर शेत करून यशस्वी शेतकरी झाले.

शासनाने कृषीविषयक धोरण राबविण्याची गरजउत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला न मिळणारा हमीभाव, कृषीविषयक धोरणाचा अभाव,  कृषी पंपांना १२ तास वीजपुरवठा  करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना सवलतीच्या कृषीविषयक अवजारे उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांची प्रगती साधण्यास मदत होईल. तसेच ५ एकर शेतीमध्ये उन्हाळी धानाचीसुद्धा लागवड केली आहे. शेती हाच एकमेव उद्योग असल्याने ते मोठ्या अभिमानाने सांगतात. स्वत: शेतीची मशागत करण्यापासून जो आनंद मिळतो तो जीवनाला एक नवा आयाम देणारा आहे, असे हेमकृष्ण कापगते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीगोंदियानागपूरमका