गडचिरोली : गावातून गोळा होणारा ओला आणि सुका कचरा याचा उपयोग करून त्याच्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याचा अभिनव उपक्रम आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात सुरू करण्यात आला आहे. प्रज्ञा महिला बचत गटाने हा उपक्रम हाती घेतला असून, त्यामुळे 'टाकाऊपासून टिकाऊ' अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.
गावातून घंटागाडीच्या माध्यमातून दररोज गोळा होणारा ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो. वर्गीकरणानंतर ओल्या कचऱ्यावर बायोकल्चर प्रक्रिया केली जाते. यासाठी सिमेंटचे खोल टाके तयार करण्यात आले आहे. टाक्यात भरलेला कचऱ्यापासून ४५ दिवसांच्या प्रक्रियेनंतर उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय कंपोस्ट खत बनते.
देऊळगाव येथील नूतन बनपूरकर आणि इंजेवारी येथील उमाकांत खोडवे यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया राबवली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने असा सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प राबविण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रज्ञा महिला बचत गटाचा हा उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, 'टाकाऊपासून टिकाऊ' या संकल्पनेला मूर्त रूप देणारा ठरला आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी सदर उपक्रम मार्गदर्शक ठरणारा आहे, हे विशेष.
नफ्यात ग्रामपंचायत व बचत गटांचा राहणार समान वाटा
तयार झालेल्या सेंद्रिय खताचे पॅकेजिंग आणि लेबलिंग ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे खत शेतकऱ्यांना विक्रीस उपलब्ध होणार असून, विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यात ५० टक्के हिस्सा ग्रामपंचायतला आणि ५० टक्के महिला बचत गटांना मिळणार आहे.
महिलांचा आत्मविश्वास वाढला
"सुरुवातीला आम्हाला घंटागाडी चालविण्याची, कचरा हाताळण्याची भीती वाटत होती. पण, ग्रामपंचायतच्या सहकार्याने आम्ही ते काम आत्मसात केले. आता आमच्याच हातून खत निर्मिती सुरू झाली आहे," असे प्रज्ञा बचत गटातील महिलांनी सांगितले. अशाप्रकारच्या रोजगारामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते.
महिलांचा सहभाग
ग्रामपंचायतीने गावातील घनकचरा संकलन व सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रज्ञा महिला बचत गटाला सोपवली. सदर उपक्रम सरपंच अल्का कुकडकर आणि ग्रामपंचायत अधिकारी विशाखा रामटेके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सुरुवातीला घंटागाडी चालविण्यापासून ते कचरा वर्गीकरणापर्यंत अनेक अडचणी आल्या; पण सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे महिलांनी हे काम आत्मसात केले असल्याचे सांगितले.